नगर परिषदेचा असहकार

By admin | Published: May 16, 2014 04:33 AM2014-05-16T04:33:33+5:302014-05-16T04:33:33+5:30

नियोजनाचा अभाव व वाहनतळाची वानवा यामुळे लोणावळा शहरात निर्माण होणारी दैनंदिन वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहर पोलिसांचा आटापिटा चालला आहे.

The non-cooperation of the Municipal Council | नगर परिषदेचा असहकार

नगर परिषदेचा असहकार

Next

लोणावळा : नियोजनाचा अभाव व वाहनतळाची वानवा यामुळे लोणावळा शहरात निर्माण होणारी दैनंदिन वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहर पोलिसांचा आटापिटा चालला आहे. मात्र, नगर परिषद प्रशासन मात्र असहकाराच्या भूमिकेत वागत आहे. त्यामुळे वाहतुक नियोजन करताना पोलीस प्रशासनाची दमछाक होत असल्याचे दिसत आहे़ पर्यटनाचे मोठे केंद्र असलेल्या लोणावळा शहरात आठवडा सुटीच्या कालावधीमध्ये हजारो पर्यटक व वाहने येत असतात. यामुळे येथील वाहतुकीचे गणित पूर्णपणे कोलमडले आहे़ या वाहतूक कोंडीचा सर्वांधिक फटका सर्वसामान्य लोणावळेकरांना बसत आहे़ अगदी हाकेच्या अंतरावर जाण्यासाठी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे़ वैद्यकीय सोयीसुविधा बाजारभागात असल्याने अनेक रुग्ण व नातेवाइकांना रोज वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो, वाहतूक कोंडीमुळे वेळेत रुग्णालयात न पोहचल्याने रुग्ण दगावल्याच्या अथवा गंभीर त्रास झाल्याच्या घटना शहरात यापूर्वी घडल्या आहेत़ लोणावळेकरांना वाहतूक कोंडीमुळे होणारा रोजचा त्रास सोडविण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी शहर पोलीस ठाण्यात रुजू झालेले प्रभारी पोलीस निरीक्षक आय़एस़पाटील यांनी वाहतूक नियोजन हा महत्त्वाचा मुद्दा हाती घेतला. नगर परिषदेने ठराव केल्याप्रमाणे मुख्य रस्ते व गल्ल्यांत एकेरी व दुहेरी वाहतूक, पार्किंग, नो पार्किंग, नो हॉल्टिंग झोन, सम व विषम पार्किंग, वाहतुकीला अडथडा ठरणारी वाहने उचलण्यासाठी क्रेन आदी बाबी राबविणे, जागोजागी फ लक लावत जनजागृती करणे, पोलीस चौक्या उभारणे आदी कामे दोन महिन्यांपासून हाती घेतली आहेत़ वास्तविक नगर परिषदेने पोलीस प्रशासनाला झोन ठरवून देत फलक, रस्त्यांवर पट्टे मारुन देणे, जागोजागी पोलीस चौक्या उभारणे, वॉर्डन उपलब्ध करून देणे आदी कामे करणे अपेक्षित आहेत. मात्र, यापैकी एकाही कामात नगर परिषद पोलिसांना सहकार्य करत नसल्याने ही कामे करताना आॅन ड्युटी पोलीस व प्रभारी अधिकार्‍यांची दमछाक झाली आहे़ गवळीवाडा नाका परिसरात अनेक हॉटेल व चिक्कीची दुकाने असल्याने बहुतांश पर्यटक खरेदी व जेवणासाठी थांबतात़ या भागात नगर परिषदेचे एकही वाहनतळ नसल्याने पर्यटक सर्रासपणे रस्त्यांवर गाड्या उभ्या करून थांबतात. यामुळे गवळीवाडा परिसरात रोज सकाळ व संध्याकाळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. वाहतूक पोलीस या गाड्या पुढे न्यायला लावतात. यामुळे वाहनचालक, दुकानदार व वाहतूक पोलीस यांच्यात सतत खटके उडतात. हीच परिस्थिती बाजार भागात आहे. शहरात कोठेही वाहनतळाची जागा उपलब्ध नसल्याने वाहने उभी करायची कोठे, असा प्रश्न उपस्थित करत पर्यटक व चालक गाड्या रस्त्यांवर उभ्या करतात़ शिवाजी पुतळा ते इंद्रायणी पूल हा मार्ग १ एप्रिलपासून एकेरी करण्यात आला ़ वाहतूक पोलीस चौकात उभे असतात तोपर्यंत लोणावळेकर देखील नियम पाळतो. मात्र, चौकातून पोलीस इतरत्र जाताच नियमांची पायमल्ली सुरू होते़ पार्किंग सुविधा नसल्यामुळे अगदी नगर परिषद इमारतीसमोर सुद्धा नो पार्किंगच्या जागेमध्ये सर्रास वाहने पार्क केली जात आहेत़ महिनाभरावर आलेल्या पावसाळ्यातही लाखो पर्यटक येतील. तेव्हा होणारी वाहतूक कोंडी योग्य प्रकारे सोडविण्यासाठी आताच नगर परिषद व पोलीस प्रशासन यांनी राजकीय मंडळी व नागरिकांना विश्वासात घेऊन वाहतुकीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे़ शक्य त्या रिकाम्या जागा नगर परिषदेने वाहनतळासाठी घेतल्यास वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (वार्ताहर)

Web Title: The non-cooperation of the Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.