नसल्या नोटा; तरीही मद्याला नाही तोटा
By admin | Published: November 17, 2016 03:43 AM2016-11-17T03:43:33+5:302016-11-17T03:43:33+5:30
कोणत्याही परिस्थितीत व्यसनपूर्ती केलीच जात असल्याने सुरुवातीचे दोन दिवस वगळता देशी, विदेशी मद्यांच्या दुकानांमध्ये किंवा बिअरबारमध्ये नेहमीप्रमाणेच ग्राहकांची वर्दळ
पुणे : कोणत्याही परिस्थितीत व्यसनपूर्ती केलीच जात असल्याने सुरुवातीचे दोन दिवस वगळता देशी, विदेशी मद्यांच्या दुकानांमध्ये किंवा बिअरबारमध्ये नेहमीप्रमाणेच ग्राहकांची वर्दळ असून विशेषत: देशी दारुच्या दुकानांमध्ये सकाळपासूनच मद्यपींची अधिक लगबग असल्याचे चित्र आहे.
८ तारखेच्या रात्री मद्यविक्री करणारी रेस्टॉरंट, बार, परमिटरुम अशा ठिकाणी असलेल्या ग्राहकांना सुटे पैसे देण्याचा आग्रह झाला. दुसऱ्या दिवसापर्यंत संभ्रम होता. वाईनशॉपसह सर्व ठिकाणी ५०० व १०००च्या नोटा स्वीकारणार नसल्याचे फलक लावण्यात आले. मात्र, बाद नोटा ३० डिसेंबरपर्यंत स्विकारार्ह असल्याचे स्पष्ट झाल्यावर आणि व्यावसायिकांची खाती करंट अकाऊंटमध्ये असल्याने या नोटा काही प्रमाणात स्वीकारल्या जाऊ लागल्या.
वाईन शॉपमध्ये एका क्वार्टरऐवजी (पावशेर) हाफ बाटली, दोन क्वार्टर, एक नाईंटी (छटाक) घेतल्यास वरचे सुटे पैसे दिले जात होते. मात्र, जवळ साठा करण्याची वेळ अनेक मद्यप्रेमींवर आली.
या दुकानांमध्ये पाहणी करुन मद्यपींचा कानोसा घेतला असता एका तरुणाने सुट्या पैशांचा काही प्रश्नच येत नसल्याचे स्पष्ट केले. सकाळपेक्षा रात्री जास्त गर्दी असल्याचा अनुभवही त्याने सांगितला.
बुधवार पेठेतील एक दुकानदार म्हणाले, देशी, विदेशी मद्य खरेदी करणा-यांच्या संख्येवर कसलाही परिणाम झालेला नाही. ज्यांना देशी दारु आवडते, ते तीच खरेदी करतात. ज्यांना बिअर किंवा वाईन, व्हिस्की आवडते ते तोच ब्रँड खरेदी करणार, अशी परिस्थिती आहे.
देशी दारुच्या दुकानांमध्ये सकाळी गर्दी वाढल्याचे बोलले जाते. मात्र, बिअरबारमध्येही सकाळी नेहमीसारखीच वर्दळ असल्याचे आणि परमीटरुममधील ग्राहकही घटले नसल्याचे सांगण्यात आले. सुटे पैसे राखून ठेवण्याकडे या व्यावसायिकांच कल असतो. अगदीच नाईलाज असल्यास बंदी असलेल्या नोटाही स्वीकारणे भाग पडले.