रस्त्यांसाठी पिण्याचे पाणी वापरणे गैर
By admin | Published: March 16, 2016 08:39 AM2016-03-16T08:39:15+5:302016-03-16T08:39:15+5:30
जिल्ह्यात व शहरात नागरिक तीव्र पाणीटंचाईला तोंड देत असताना महापालिकेच्या वतीने सिमेंट रस्ते व अन्य विकासकामांसाठी सर्रास पिण्याचे पाणी वापरले जात असल्याचे
पुणे : जिल्ह्यात व शहरात नागरिक तीव्र पाणीटंचाईला तोंड देत असताना महापालिकेच्या वतीने सिमेंट रस्ते व अन्य विकासकामांसाठी सर्रास पिण्याचे पाणी वापरले जात असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे पिण्याच्या पाण्याचा रस्त्यांच्या कामांसाठी वापर अत्यंत गैर असून, अशी बांधकामे त्वरित थांबवा, अशा स्पष्ट लेखी सचूना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेला दिल्या आहेत.
सध्या राज्यासह पुणे जिल्ह्यातदेखील तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यांचा विचार करता पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने केला तरच जूनअखेरपर्यंत किमान पिण्यासाठी पाणी पुरेल. असे असताना पुणे महापालिकेच्या वतीने सध्या मोठ्या प्रमाणात सिमेंटच्या रस्त्यांचे काम सुरू आहे. तसेच अन्य विकासकामांसाठीदेखील पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत राव यांना विचारले असता त्यांनी सांगितले, की जिल्ह्यातील २५ धरणांमध्ये असलेले सर्व पाणी आता केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवण्यात आले आहे. तसेच पिण्याच्या पाणी वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे कोणत्याही स्वरुपाच्या बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करणे अत्यंत गैर आहे. एखाद्या विकासकामामुळे फार मोठी आडकाठी होणार नसेल तर अशी कामे त्वरित थांबवली पाहिजेत.
‘सामूहिक होळी’,
‘रेन डान्स’वर बंदी
जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर येत्या २३ रोजी साजऱ्या होणाऱ्या होळीनिमित्त आयोजित केले जाणारे रेन डान्स, सामूहिक होळी आयोजनावर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी कोणत्याही स्वरुपात मान्यता देण्यात येणार नसल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांनीदेखील होळीनिमित्त पाण्याचा गैरवापर टाळून जास्तीत जास्त पाण्याची बचत करावी, असे आवाहन राव यांनी केले.