अतिक्रमण कारवाई झालेल्यापैकी एक जणही बेघर होणार नाही : महापौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:09 AM2021-06-25T04:09:39+5:302021-06-25T04:09:39+5:30

पुणे : “दांडेकर पुल परिसरात गुरुवारी झालेली कारवाई महापालिकेकडून करण्यात आली. मात्र ही कारवाई करताना प्रशासनाने नागरिकांना विश्वासात घेणे ...

None of the encroachers will be homeless: Mayor | अतिक्रमण कारवाई झालेल्यापैकी एक जणही बेघर होणार नाही : महापौर

अतिक्रमण कारवाई झालेल्यापैकी एक जणही बेघर होणार नाही : महापौर

Next

पुणे : “दांडेकर पुल परिसरात गुरुवारी झालेली कारवाई महापालिकेकडून करण्यात आली. मात्र ही कारवाई करताना प्रशासनाने नागरिकांना विश्वासात घेणे आवश्यक होते. अतिक्रमण कारवाई घाईने केली गेल्याचे माझे मत आहे. परंतु, अतिक्रमण कारवाई झालेल्यांपैकी एकही नागरिक बेघर होणार नाही, याची जबाबदारी महापालिकेतील सत्ताधारी म्हणून आम्ही घेतो,” असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारांना सांगितले.

मोहोळ म्हणाले की, महापालिकेकडून ज्या ठिकाणी अतिक्रमण कारवाई झाली तो भाग १९८७ च्या डीपीमध्ये सरळ दाखविला गेला होता. तो ८ मीटरचा असून ‘यू’ आकारात आहे. प्रत्यक्षात त्याची रूंदी २४ मीटर असणे अपेक्षित आहे. येथे आंबिल ओढ्याची रुंदी वाढविण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण या ‘यू’ आकारामुळे या भागातील आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाळ्यात नेहमी पाणी घुसत होते. येथील ओढा रुंदीकरण एक दिवस करावेच लागणार होते. परंतु, या भागातील नागरिकांना स्थलांतरित करताना त्यांना विश्वासात घेणे, योग्य समन्वय राखणे जरूरी होते.”

चौकट

मार्चमध्येच दिली होती नोटीस

“ओढ्यात अतिक्रमण असलेल्या १३० घरांशी महापालिकेचा संबंध आहे. दांडेकर पूल परिसरातील आंबिल ओढ्यातील अतिक्रमणाबाबत मार्च महिन्यातच संबंधितांना महापालिकेने जाहीर प्रकटनाव्दारे नोटीस पाठविली होती. परंतु, ती किती जणांनी वाचली हेही पाहणे जरूरी असल्याने नागरिकांना थोडासा वेळ देणे आवश्यक होते. नागरिकांनी या अतिक्रमण कारवाईला विरोध केला नव्हता. पण आज ज्याप्रकारे कारवाई झाली त्याला त्यांनी विरोध केला,” असे महापौर मोहोळ म्हणाले.

चौकट

हस्तक्षेप करणाऱ्यांवर कारवाई होईलच

“आंबिल ओढ्यातील रुंदीकरण करताना महापालिकेचा केवळ १३० घरांशी संबंध होता. त्यानुसार महापालिकेने नोटीसही पाठविली होती. काही नागरीक बिल्डरकडून नोटीस आल्याचे आज सांगत असले तरी त्या बिल्डरशी महापालिकेचा काही संबंध नाही. तो विषय इतर ६००/७०० घरांबाबतचा आहे. तरीही महापालिकेच्या कारवाईत कोणी हस्तक्षेप केला असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल,” असेही महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले.

चौकट

ओढ्याचा प्रवाह सरळ करणे हाच हेतू

सप्टेंबर, २०१९ मध्ये आंबिल ओढ्याला मोठा पूर आल्याने आजूबाजूचा मोठा परिसर बाधित झाला. मनुष्यहानी बरोबरच मोठ्याप्रमाणात वित्तहानीही या वेळी झाली. घरेच्या घरे वाहून गेली. आंबिल ओढ्याचा हा धोका लक्षात घेऊन एक ‘मास्टर प्लॅन’ तयार केला गेला. यात संपूर्ण ओढ्याचे रुंदीकरण, खोलीकरण, सीमाभिंत बांधणे, कलव्हर्टची कामे करणे, अतिक्रमणे काढणे यासह दांडेकर पूल परिसरातील ओढ्याचा मूळ प्रवाह सरळ करणे ही कामे असल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

Web Title: None of the encroachers will be homeless: Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.