बेकायदा सावकारीचे पेव, नीरा परिसरात पेव वाढल्याने सर्वसामान्य हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 05:30 AM2018-03-11T05:30:47+5:302018-03-11T05:30:47+5:30

खासगी सावकारीची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी राज्य शासनाने कंबर कसली असली तरी मनगटशाही, तक्रारीचा अभाव, गावगुंडांची भीती, राजकीय वरदहस्त, सहकार विभागाची ‘चुप्पी’ यामुळे नीरा व परिसरात खासगी सावकारी बळावत आहे. याची वार्षिक उलाढाल कोट्यवधींच्या घरात पोहोचली आहे.

Normal bribe inflammation, normal relaxation due to influx in neera area | बेकायदा सावकारीचे पेव, नीरा परिसरात पेव वाढल्याने सर्वसामान्य हवालदिल

बेकायदा सावकारीचे पेव, नीरा परिसरात पेव वाढल्याने सर्वसामान्य हवालदिल

Next

नीरा - खासगी सावकारीची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी राज्य शासनाने कंबर कसली असली तरी मनगटशाही, तक्रारीचा अभाव, गावगुंडांची भीती, राजकीय वरदहस्त, सहकार विभागाची ‘चुप्पी’ यामुळे नीरा व परिसरात खासगी सावकारी बळावत आहे. याची वार्षिक उलाढाल कोट्यवधींच्या घरात पोहोचली आहे. या व्यवसायात समाजातील पुढारलेल्या वर्गाबरोबरच मोठ्या प्रतिष्ठित धेंडांचाही समावेश असल्याने प्रशासन कारवाईला धजावत नसल्याचे चित्र आहे.
जुन्या सावकारी कायद्यात आमूलाग्र सुधारणा करत खासगी सावकारीचे नियमन करण्यासाठी राज्य शासनाने २०१४ मध्ये कायदा संमत केला. बेकायदा सावकारी करणाºयांवर कायद्याचा वचक बसवत शिक्षेत वाढ केली. विशेष पोलीस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांनीही बेकायदा सावकारीचे उच्चाटन करण्यासाठी कंबर कसली. मात्र नीरेसारख्या मोठी बाजारपेठ असलेल्या गावात बेकायदा सावकारी करणारे अनेकजण कायद्याच्या बडग्यापासून कायमच दूर राहिले. त्यामुळे मागील काही वर्षांत हा व्यवसाय चांगलाच फोफावला आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांबरोबर पुढारलेला समाजही सावकारीच्या जाळ्यात ओढला जात आहे. आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी अशा सावकारांकडून कर्जाऊ रक्कम घेतली जाते. या सावकारांची संख्याही मोठी आहे. मनमानी पद्धतीने १० ते ४० टक्क्यांपर्यंत व्याजआकारणी केली जाते. ठरलेल्या वायद्याला मुद्दल न मिळाल्यास पुढील प्रत्येक दिवसाला आगाऊ व्याज आकारणी केली जाते. मुद्दल तसेच व्याजाची परतफेड न झाल्यास कर्जधारकाच्या घरी जाऊन घरातील वस्तू राजरोसपणे जप्त केल्या जातात. अनेकदा हाणामाºयाही होतात. माराच्या भीतीने कर्जदार पुन्हा दुसºया सावकाराकडून कर्ज काढतो किंवा पर्यायी मार्ग शोधतो. अनेक सावकारांची वार्षिक कमाई लाखोंच्या घरात आहे.
ग्रामीण भागात भिशीच्या मोहापायी अनेक जणांना आतापर्यंत गंडा घातला गेला आहे. लिलाव भिशीच्या प्रकारात अनेकांनी मोहापायी आपले पैसे गुंतवले. ‘फंडाच्या’ माध्यमातूनही गोरगरीब जनतेची लाखो रुपयांची लूट सुरूच आहे.
यात्रा फंड गुढीपाडव्याला जमा करून रक्कम गरजूला द्यायची व त्यावर व्याजआकारणी करून पुढील पाडव्याला ती रक्कम फंडात समाविष्ट करायची. या सर्वांमुळे सर्वसामान्य भरडले जात आहेत. मात्र याविरोधात तक्रारी करायला कोणी धजावत नसल्याने ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ अशी स्थिती आहे.

कायदा, सुव्यवस्था बसवली धाब्यावर

दरम्यान, सावकारी पैशाच्यासंदर्भात अनेकदा वाद होतात. गावगुंड यात सहभागी होतात. अनेकदा सावकार दमदाटी करण्यासाठी बाहेरून गुंड (बाऊन्सर) बोलावतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसवली जाते. मात्र शासन यंत्रणेला याचे काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसते.
कर्जाच्या पैशातून नुकतीच नीरा येथे भांडणे झाली. यात एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. सावकार वसुलीसाठी कोणत्याही थराला जात असल्याने पैशातून उद्भवणाºया वादाचे पर्यवसान मोठ्या हाणामारीत होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अशा घटना दौंडमध्ये गेल्या महिन्यात घडलेल्या आहेत. त्यामुळे यंत्रणांनी बेकायदा सावकारांच्या मुसक्या तातडीने आवळाव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

जर कोणी बेकायदा सावकार लोकांची पिळवणूक करत असेल किंवा अशा प्रकारचा बेकायदा व्यवसाय करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. लोकांनी तक्रारीसाठी न घाबरता पुढे यावे. अशा व्यावसायिकांवर यापुढे पोलीस प्रशासनाचे बारकाईने लक्ष राहील.
-डी. एस. हाके, पोलीस निरीक्षक, जेजुरी

Web Title: Normal bribe inflammation, normal relaxation due to influx in neera area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.