महिलेची घरातच 'नॉर्मल' प्रसूती
By admin | Published: January 30, 2016 03:58 AM2016-01-30T03:58:44+5:302016-01-30T03:58:44+5:30
'सिझेरियन'ला पर्याय नाही असे सांगत डॉक्टरांनी एका गरीब बाळंतिणीला असहाय केले. शस्त्रक्रियेचा खर्च परवडणारा नसल्याने ती बिचारी पतीसमवेत घरी निघून आली. बाळाला जन्म
शिरूर : 'सिझेरियन'ला पर्याय नाही असे सांगत डॉक्टरांनी एका गरीब बाळंतिणीला असहाय केले. शस्त्रक्रियेचा खर्च परवडणारा नसल्याने ती बिचारी पतीसमवेत घरी निघून आली. बाळाला जन्म द्यायचा कसा, या विवंचनेत पती पत्नी असताना 'देव तारी...' या उक्तीला या शोभावे या प्रमाणे तिची घरातच नॉर्मल प्रसूती झाली. झपाट्याने वाढत्या व्यावसायिकता अंगीकारणाऱ्या वैद्यकीय पेशालाही विचार करायला लावावी अशी ही घटना प्रत्यक्षात घडली.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या बाळासाहेब लोणारे हे तीन दिवसांपूर्वी पत्नीची प्रसूती करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात गेले. प्रसूतीसाठीचा कालावधी पूर्ण झालेला होता. ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याने तिची इतर डॉक्टरने व्यवस्थित तपासणी न करता शस्त्रक्रिया करावी लागेल, तुम्ही ससूनला जा, असा सल्ला दिला. या दाम्पत्याने खासगी डॉक्टरांचाही दरवाजा ठोठावला. तिथेही शस्त्रक्रियाच करावी लागेल, असे सांगितले. खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेचा खर्च गरिबांना परवडणारा नाही. ससूनला जाणे शक्य नाही अशा असहाय अवस्थेत ती महिला पतीसह घरी आली. त्याचदिवशी संध्याकाळी ही महिला घरातच प्रसूत झाली. विशेष म्हणजे, बाळ-बाळंतिणीची प्रकृती ठिक आहे. सर्वसामान्य गरीब घटकांसाठी शासनाने ग्रामीण रुग्णालये सुरू केली. मात्र, रुग्णालयांच्या इमारतीच उभारल्या. सुविधांपासून रुग्ण वंचित राहत आहेत. ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यास काय हरकत आहे. तेथे शस्त्रक्रिया केल्यास गरीब महिला रुग्णांना आधार मिळू शकेल.
अनुत्तरीत काही प्रश्न
शस्त्रक्रिया करण्याएवढी तिची परिस्थिती गंभीर होती, तर तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल का करण्यात आले नाही, खासगी डॉक्टरांनीही व्यवसाय न पाहता सेवा या दृष्टिकोनातून तिची साधारण प्रसूती का नाही केली, असे प्रश्न यातून निर्माण झाले आहेत.