शिक्षक प्रशिक्षणासाठी नॉर्वेचे सहकार्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 02:39 AM2018-08-23T02:39:54+5:302018-08-23T02:40:19+5:30
शिक्षणशास्त्र विभागासह संयुक्त उपक्रम; दीड कोटीची करणार मदत
पुणे : उत्तर युरोपातील देशांमध्ये शिक्षणाच्या अध्यापन पद्धती, शिक्षक प्रशिक्षण याबाबत वेगवेगळे प्रयोग राबविले जात आहेत. विशेषत: नॉर्वेमध्ये शिक्षण सुधारणांसाठी वेगवेगळे प्रयोग करण्यात आलेले आहेत. या प्रयोगांतून आलेले निष्कर्ष, अनुभव यांची नार्वेचे साऊथ-ईस्ट विद्यापीठ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभाग यांच्या देवाणघेवाण होणार आहे.
शिक्षण प्रशिक्षण, अध्यापन, अभ्यास पद्धती याबाबत आदान-प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर, या उपक्रमासाठी साऊथ-ईस्ट विद्यापीठाकडून शिक्षणशास्त्र विभागाला दीड कोटी रुपयांचे अनुदान मिळणार असल्याची माहिती शिक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली.
शिक्षणशास्त्र विभागातील विद्यार्थी, शिक्षक नार्वेला भेट देऊन तिथल्या शिक्षण पद्धती व शिक्षणात करण्यात आलेल्या प्रयोगांचा अभ्यास करणार आहेत. त्याचबरोबर, साऊथ-ईस्ट विद्यापीठातील शिक्षक व विद्यार्थीही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात येऊन अभ्यास करणार आहेत. या संयुक्त उपक्रमातून गुणवत्तापूर्ण संशोधन व प्रशिक्षणासाठी मोठी मदत होईल.
आॅक्टोबरमध्ये जाणार पहिली टीम
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागातील पहिली टीम आॅक्टोबर २०१८मध्ये नॉर्वेला जाणार आहे.
यामध्ये शिक्षणशास्त्र विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी यांचा समावेश असणार आहे.
उत्तर युरोपीय देशांतील माध्यमिक व प्राथमिक शिक्षण जगात नावाजलेले आहे. साऊथ-ईस्ट नॉर्वे विद्यापीठातील शिक्षण प्रशिक्षणाची पद्धत या प्रकल्पाद्वारे समजून घेण्यास मदत होणार आहे. शिक्षण प्रशिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयोगी ठरेल. तसेच, नार्वेमध्ये बहुसांस्कृतिक शिक्षक तयार करण्यास शिक्षणशास्त्र विभागाकडून मदत केली जाणार आहे.
- डॉ. संजीव सोनावणे,
विभागप्रमुख, शिक्षणशास्त्र विभाग
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १९९०मध्ये शिक्षणशास्त्र विभाग सुरू झाला. सध्या या विभागामार्फत एमएड, एमए एज्युकेशन व बीएस्सी बीएड आदी अभ्यासक्रम चालविले जात आहेत.
सध्या आंबेडकर भवन येथे असलेल्या शिक्षणशास्त्र विभागाचे लवकरच सेट भवन येथील स्वतंत्र इमारतीमध्ये स्थलांतर होणार आहे.