Pune Station: पुणे स्टेशनवर बॉम्ब नव्हे; फटाक्याच्या पुंगळ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 05:33 PM2022-05-13T17:33:29+5:302022-05-13T17:34:41+5:30

रेल्वे प्रशासन, लोहमार्ग आणि शहर पोलिसांसह प्रवाशांनी सोडला सुटकेचा निश्वास

Not a bomb at Pune station Firecrackers | Pune Station: पुणे स्टेशनवर बॉम्ब नव्हे; फटाक्याच्या पुंगळ्या

Pune Station: पुणे स्टेशनवर बॉम्ब नव्हे; फटाक्याच्या पुंगळ्या

googlenewsNext

पुणे : वेळ सकाळची. पुणेरेल्वे स्टेशनचा परिसर प्रवाशांच्या गर्दीने गजबजलेला. तिथं बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याची बातमी वा-यासारखी पसरली अन एकच खळबळ उडाली. रेल्वे स्टेशनवर भीतीचे वातावरण पसरले. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वे प्रशासन, लोहमार्ग आणि शहर पोलीस तसेच बॉम्बशोधक आणि बॉम्बनाशक पथक या यंत्रणांची तर चांगलीच झोप उडाली. दोन तासाच्या या गोंधळानंतर त्या वस्तू बॉम्ब नसून फटाक्याच्या पुंगळ्या असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर यंत्रणांसह प्रवाशांनीही सुटकेचा निश्वास टाकला.

रेल्वे स्टेशनमध्ये आरक्षण केंद्रासमोरील मोकळ्या जागेत जुन्या प्रवेशद्वाराजवळ बॉम्ब सदृश्य वस्तू दिसत असल्याची माहिती स्वच्छता महिला कर्मचारी आणि इलेक्ट्रिक वाहन चालक यांनी लोहमार्ग पोलिसांना सकाळी साडेदहा वाजता दिली. ही माहिती मिळताच पोलीस ठाण्यातील पथक घटनास्थळी रवाना झाले. ही माहिती शहर पोलीस, बॉम्बशोधक व नाशक पथक आणि अग्निशामक दलाला देण्यात आल्यानंतर या यंत्रणांची धावाधाव सुरू झाली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सहआयुक्त संदीप कर्णीक यांनी घटनास्थळी हजेरी लावली. वस्तू आढळलेला परिसर रिकामा करण्यात आला तसेच स्टेशनच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.

बॉम्बशोधक व नाशक पथकाने तसेच श्वान पथकाने वस्तूची तपासणी केली असता त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्फोटक पदार्थ नसल्याचे तसेच त्या जिलेटीनच्या कांड्या नसल्याचे स्पष्ट झाले. संबंधित वस्तूची तपासणी करण्यासाठी तसेच ते स्फोटक सदृश्य पदार्थ असल्याचे आढळून आल्यास ते निकामी करण्यासाठी बी. जे. मेडिकल कॉलेजच्या मैदानावर ही वस्तू नेण्यात आली. त्यानंतर ही बॉम्बसदृश्य वस्तू नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
दुपारी बारा नंतर स्थानकावरील व्यवहार सुरळीत झाले. या घटनेत कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. रेल्वे स्टेशनवरील रेल्वे वाहतूक सुरळीत झाल्याचे लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद गं. वायसे-पाटील यांनी सांगितले.

रेल्वे स्थानकावर आढळलेल्या जिलेटीन सदृश्य वस्तूची तपासणी करण्यात आली आहे. ती स्फोटके नसल्याचे स्पष्ट झाले असून हा घातपाताचा प्रकार नाही. रेल्वे आणि पुणे पोलीस तपास करीत असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.  

Web Title: Not a bomb at Pune station Firecrackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.