'एकही उमेदवार नको', ४२ हजार ९४६ पुणेकरांची 'नोटा' ला पसंती, चिंचवड सर्वाधिक, इंदापूर सर्वात कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 12:46 PM2024-11-25T12:46:27+5:302024-11-25T12:47:21+5:30

ईव्हीएम मशीनवर उमेदवारांच्या यादीच्या तळाशी ‘वरीलपैकी एकही नाही’ म्हणजेच नोटा, असा एक पर्याय असतो

'Not a single candidate', 42 thousand 946 Pune residents prefer 'NOTA', Chinchwad is the highest, Indapur is the lowest | 'एकही उमेदवार नको', ४२ हजार ९४६ पुणेकरांची 'नोटा' ला पसंती, चिंचवड सर्वाधिक, इंदापूर सर्वात कमी

'एकही उमेदवार नको', ४२ हजार ९४६ पुणेकरांची 'नोटा' ला पसंती, चिंचवड सर्वाधिक, इंदापूर सर्वात कमी

पुणे : विधानसभा निवडणुकीत उमेदवार पसंत नसल्यास मतदारांना ‘नोटा’ला (यापैकी एकही उमेदवार नाही.) मते देण्याचा अधिकार आहे. मतमोजणीनंतर जिल्ह्यातील चिंचवड मतदारसंघात सर्वाधिक ४ हजार ३१६ ‘नोटा’ला पसंती देण्यात आली आहे. तर त्यानंतर शहरातील वडगाव शेरी मतदारसंघातही ४ हजार २५९ मते ‘नोटा’ला पडली आहेत. पिंपरी मतदारसंघातही ‘नोटा’ला ४ हजार १३ मते मिळाली. तर सर्वांत कमी ६३४ मते इंदापूर मतदारसंघात पडली आहेत. एकूण ४२ हजार ९४६ पुणेकरांनी २०२४ च्या निवडणुकीत नोटाला पसंती दिल्याचे समोर आले आहे.  

‘नोटा’ला मिळालेली मते मतदारसंघनिहाय

जुन्नर : १३७६, आंबेगाव : ११५७, खेड-आळंदी : १६९२, शिरूर : २१८७, दौंड : १२११, इंदापूर : ६३४, बारामती : ७७९, पुरंदर : १४८४, भोर : २७२०, मावळ : २७१५, चिंचवड : ४३१६, पिंपरी : ४०१३, भोसरी : २६८५, वडगाव शेरी : ४२५९, शिवाजीनगर : २०४४, कोथरूड : ३१५२, खडकवासला : २९००
पर्वती : २४६१, हडपसर : २९४६, पुणे कॅन्टोन्मेंट : १८१५, कसबा पेठ : १२१३. 

नोटा पर्यायाची सुविधा २०१४ पासून मिळत आहे. हा पर्याय उपलब्ध हाेताच, पहिल्याच निवडणुकीमध्ये बहुतांश ठिकाणी नोटाला सातव्या, आठव्या क्रमांकाची मते मिळाली हाेती. याच निवडणुकीत सर्वाधिक ४ हजार ४३५ मते पिंपरी मतदारसंघात मिळाली होती. विशेष म्हणजे, सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीत नोटाला ३ मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकाची; तर ७ मतदारसंघात चौथ्या क्रमांकाची मते मिळाली हाेती.

पुणे जिल्ह्यातील पिंपरी मतदारसंघात २०१४ मध्ये विजयी उमेदवार गौतम चाबुकस्वार यांच्या मताधिक्यापेक्षा जास्त मते नोटाला होती, तर २०१९ मध्ये दौंड मतदारसंघात विजयी उमेदवार राहुल कुल यांच्या मताधिक्यापेक्षा जास्त मते नोटाला होती. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नाेटाला सर्वाधिक मते चिंचवड मतदारसंघात मिळाली. ही मते एकूण मतदानाच्या तब्बल २.११ टक्के अर्थात, ५ हजार ८७४ इतकी होती. याच निवडणुकीत कोथरूड मतदारसंघातही एकूण मतदानाच्या २ टक्के अर्थात, ४ हजार २८ मतदारांनी नोटाला पसंती दिली होती.

नोटाचा पर्याय का?

मतदान हा प्रत्येकाचा महत्त्वाचा हक्क आणि अधिकार आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाने आपल्या या अधिकाराचा वापर केला पाहिजे, तरच लोकशाही टिकून राहील. चांगले राज्यकर्ते निवडून देण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे, पण तुम्हाला निवडणुकीत उभा असलेला कोणताही उमेदवार योग्य वाटत नसेल तर तुम्ही नोटा हा पर्याय वापरू शकता. मतदान यंत्रावर (ईव्हीएम) निवडणुकीत उभा असलेला उमेदवार आणि त्याचा पक्ष आणि पक्षाचे चिन्ह अशी यादी दिलेली असते. ज्या उमेदवाराला मतदान करायचे आहे, त्याच्या चिन्हासमोरील बटण दाबून मतदान केले जाते. मात्र, यंत्रावरील उमेदवारांच्या यादीच्या तळाशी ‘वरीलपैकी एकही नाही’ म्हणजेच नोटा, असे लिहिलेले एक पर्याय देखील आहे. मतदारांना त्यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवणारा कोणताही उमेदवार योग्य वाटत नसेल तर मतदार नोटा हा पर्याय निवडू शकतो. याद्वारे मतदारांना सर्व उपलब्ध उमेदवारांना नाकारण्याचा अधिकार मिळतो.

Web Title: 'Not a single candidate', 42 thousand 946 Pune residents prefer 'NOTA', Chinchwad is the highest, Indapur is the lowest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.