मुश्रीफांच्या धमक्यांना घाबरत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:14 AM2021-09-14T04:14:47+5:302021-09-14T04:14:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: हसन मुश्रीफ याच्यावर किरीट सोमय्या यांनी अभ्यासपूर्वक आरोप केलेत, पण मुश्रीफ म्हणे माझ्यावर दावा दाखल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: हसन मुश्रीफ याच्यावर किरीट सोमय्या यांनी अभ्यासपूर्वक आरोप केलेत, पण मुश्रीफ म्हणे माझ्यावर दावा दाखल करणार आहेत, पण मी असल्या धमक्यांना घाबरत नाही अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना प्रत्युत्तर दिले.
पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले की, किरीट सोमय्या यांनी सगळीकडे फिरून अभ्यास करावा व घोटाळे उघड करावेत, असे आमच्या कामाचे वाटप आहे. पण, माझे नाव घेतल्याशिवाय मुश्रीफ यांना झोप येत नाही, माझे नाव हीच त्यांच्यासाठी गोळी आहे. सध्या सगळे घोटाळे मोठ्या रकमेचे निघत आहेत. त्यामुळे मुश्रीफ यांनी १०० कोटींचा नाही तर ५०० कोटींचा दावा दाखल करावा. पण त्यासाठी स्टॅम्प ड्यूटी व्हाईट मनीमध्ये भरावी लागते ते कुठून आणणार, हेही त्यांनी सांगावे.
छगन भुजबळ यांना क्लीन चीट मिळाली यावर त्यांचे थेट नाव न घेता पाटील म्हणाले की, काय झाले ते त्यांना व त्यांच्या वकिलांनाच माहिती आहे. १०० कोटींची मालमत्ता जप्त झाली आहे हे मात्र सर्वांना ठाऊक आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सोमय्या यांनी ३०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले, पण त्यांना तर मंत्रिपदाचे बक्षिस मिळाले ते कसे, या प्रश्नावर पाटील यांनी राणेच काय, पण भाजपाचा कोणीही कार्यकर्ता चुकला तरी सोडणार नाही, असे सांगितले. त्यांच्यावर ज्या एजन्सीनी आरोप केले, त्यांनाच तुम्ही त्याचे काय झाले ते विचारा, असे पाटील म्हणाले.
आम्ही सरकार अस्थिर करतो आहोत असे म्हणता, पण तुम्ही तर फेव्हिकॉलसारखे घट्ट आहात, तर मग घाबरता कशाला, असा प्रश्न पाटील यांनी केला. गुजरातचे मुख्यमंत्री बदलले तर बदलले. असा विषय फक्त भाजपाच करू शकते. विरोधी पक्षांना तर राष्ट्रीय अध्यक्षच नाही व याबाबत त्यांना निवडणूक आयोगाने विचारणा केली आहे अशी टीका पाटील यांनी केली.
इथे महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होत आहेत. मात्र, राज्य महिला आयोगाला अध्यक्ष नाही याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, असे पाटील म्हणाले.