शंभर गुन्हे दाखल झाले तरी घाबरत नाही; राष्ट्रवादीची गुंडगिरी संपवणार, पुण्यातून भाजपचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 15:33 IST2022-05-18T15:32:07+5:302022-05-18T15:33:01+5:30
पुणे शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते गुंडगिरी करीत असून, त्यांच्यावर पोलिसांचा आणि सरकारचा अंकुश राहिलेला नाही

शंभर गुन्हे दाखल झाले तरी घाबरत नाही; राष्ट्रवादीची गुंडगिरी संपवणार, पुण्यातून भाजपचा हल्लाबोल
पुणे : पुणे शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते गुंडगिरी करीत असून, त्यांच्यावर पोलिसांचा आणि सरकारचा अंकुश राहिलेला नाही. शहराची संस्कृती बुडविण्याचे पाप करणाऱ्या राष्ट्रवादीची गुंडगिरी संपवणार असल्याचा इशारा भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला.
मुळीक म्हणाले, सोमवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात घुसून त्यांच्यावर हल्ला करण्याचा नियोजनबद्ध कट राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आखला होता. त्याप्रमाणे सेनापती बापट रस्त्यावरील चौकात आंदोलन करणारे हॉटेल मेरियेटच्या प्रवेशद्वारातून आत पोहोचले. त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सुरक्षा रक्षकांच्या गाडीवर आक्रमण केले. बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंडी आणि शाईच्या बाटल्या घेऊन आले होते. या गुंडांवर कोणतेही गंभीर गुन्हे दाखल झालेले नाहीत. उलट भाजपच्या कार्यकर्त्यांवर विनयभंगासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. हे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत आणि राष्ट्रवादीच्या गुंडांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आम्ही करीत आहोत.
तर लढा सुरूच राहील
''राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपच्या पदाधिकार्यांवर हल्ले करीत आहेत. नागरिकांना दमदाटी करीत आहेत. ठिकठिकाणी हप्ते वसुल करीत आहेत. त्यांच्या विरोधात जे आवाज उठवतील त्यांची पोलिसांच्या मदतीने गंभीर गुन्हे दाखल केले जात आहे. अशा गळचेपीला भाजपचे कार्यकर्ते घाबरत आहेत. शंभर गुन्हे दाखल झाले तरी आम्ही घाबरत नाही. गुंडगिरी विरोधातील आमचा लढा सुरूच राहील असे कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.''