नदीपात्रात बेवारस वाहनांचा खच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 06:12 PM2018-12-11T18:12:37+5:302018-12-11T18:16:39+5:30
पुणे महापालिका आणि पुणे वाहतूक पोलिसांनी संयुक्तरित्या रस्त्यावर बेवारस असलेल्या तसेच वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई केली.
पुणे : पुणे महापालिका आणि पुणे वाहतूक पोलिसांनी संयुक्तरित्या रस्त्यावर बेवारस असलेल्या तसेच वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. ही कारवाई केलेली वाहने सध्या नदीपात्रात लावण्यात आली आहेत.
हायकोर्टाच्या आदेशानुसार पुणे महापालिका आणि पुणे वाहतूक शाखेकडून संयुक्त कारवाई करून रस्त्यावरील बेवारस आणि वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने उचलण्यात आली. रविवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. यात शहरातील विविध भागांतील 100 हुन अधिक चारचाकी आणि दुचाकींचा समावेश आहे. या कारवाई दरम्यान काही वाहनांचे नुकसान झाल्याने नागरिकांनी या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच नुकसान झालेल्या वाहनांची भरपाई कोण देणार असा सवालही उपस्तिथ करण्यात येत आहे.
या कारवाईमध्ये रस्त्यावर लावण्यात आलेली नवीन वाहने सुद्धा उचलण्यात अली आहेत. पालिकेने कुठलीही नोटीस न देता ही कारवाई केल्याने नागरिकांना सकाळी आपली वाहने न दिसल्याने अनेकांनी पोलीस स्टेशनमध्ये वाहन चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली. जे नागरिक आपली वाहने सोडवायला आले त्यांच्याकडून अवाच्या सव्वा दंडाची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर कारवाई दरम्यान अनेक वाहनांचे नुकसान झाल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.