...असा गंधर्व होणे नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:08 AM2021-07-15T04:08:33+5:302021-07-15T04:08:33+5:30
ज्या व्यक्तींनी तब्बल चार तप मराठी रसिकांच्या हृदयावर एखाद्या सम्राटासारखं राज्य केलं, ‘एकला नयनाला विषय तो जाहला’ असं ज्यांचं ...
ज्या व्यक्तींनी तब्बल चार तप मराठी रसिकांच्या हृदयावर एखाद्या सम्राटासारखं राज्य केलं, ‘एकला नयनाला विषय तो जाहला’ असं ज्यांचं अद्वितीय असं स्थान होतं, त्या नटसम्राट बालगंधर्वाच्या घराण्यात आपण सून म्हणून आलो. पण या व्यक्तीला आपण पाहूू शकलो नाही, त्यांचा सहवास आपल्याला लाभू शकला नाही, ही खंत मनात होती. म्हणूनच बालगंधर्वांच्या एकेक वस्तूंचा मी संग्रह करायला सुरुवात केली. बालगंधर्वांचे सुमारे २०० च्या वर फोटो, त्यांना मिळालेली मानपत्रे, त्यांनी सादर केलेल्या सुमारे २७ नाटकांच्या प्रती, त्यांनी नाटकात वापरलेले शेले, १९३४ मध्ये प्रभात फिल्म कंपनीशी केलेल्या कराराची प्रत, त्यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके, लेख, पोस्टाची, लॉटरीची तिकिटं, त्यांनी ‘द्राक्षासव’ या सिरपची केलेली जाहिरात, जन्मफिका रत्नाकर मासिकाने १९९१ मध्ये काढलेला गंधर्व विशेषांक, ‘गुप्तमंजूष’ नाटकाचं कोल्हटकरांच्या अक्षरात हस्तलिखित, बालगंधर्वांच्या रेकार्डस, ग्रामोफोन, गडकऱ्यांचं ‘राजहंस माझा निजला’ या काव्याचं हस्तलिखित, बालगंधर्वांच्या निधनानंतर निरनिराळ्या वृत्तपत्रांनी लिहिलेले अग्रलेख, त्यात आचार्य अत्रेंचा ‘राजहंस माझा निजला’, टाईम्सचा ‘स्वान ऑन मराठी थिएटर’ या अग्रलेखांचा समावेश आहे.
नव्या पिढीला बालगंधर्व कळावेत व जुन्या पिढीला पुन: प्रत्ययाचा आनंद मिळावा, या हेतूने या संग्रहाची मी प्रदर्शने आयोजित करत असते. यात पुणे, ठाणे, डोंबिवली, नगर, सोलापूर, रत्नागिरी, सांगली, जळगाव अशा अनेक ठिकाणी नाट्यसंमेलनाच्या माध्यमातून प्रदर्शने आयोजित केली आहेत. रसिकांचाही उदंड प्रतिसाद मिळतो. संगीत नाटकांच्या सुवर्णकाळ रसिकांना पुन्हा अनुभवता येतो, तसेच यातून या रिमिक्सच्या जमान्यात अभिजात संगीताविषयी तरुणांना आवड लागावी, असाही माझा प्रयत्न असतो. आपल्या लाडक्या पु. ल. देशपांडेंसारख्या अनेक रसिकांनीही मला हा संग्रह वाढविण्यास मदत केली आहे.
नितीन देसाई निर्मित ‘बालगंधर्व’ या चित्रपटासाठीही मी हा खजिना उपलब्ध करून दिला होता. आपल्या लाडक्या ‘पुल’नी म्हंटलय की, ‘माझ्या समाधीवर मी फक्त गंधर्वांना ऐकलंय’ एवढे लिहीलत तरी पुरेसं आहे. ते ‘बालगंधर्व’ म्हणजे जणू पंचाक्षरी मंत्रच! संगीताचा अभ्यास करण्यासाठीचे विद्यापीठ. सर्व रसिकांच्या मनातील त्यांच्या आठवणी म्हणजे ‘मर्मबंधातील ठेवच.’ पण माझ्यासाठी मात्र हा अमूल्य अशा खजिनाच आहे. मम सुखाची ठेव आहे. मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ही ठेव जपून ठेवायची आहे! असा बालगंधर्व पुन्हा कसा होणार? हे देवाघरचं देणं, भाग्याचं लेणं पुन: पुन्हा कसं लाभणार? शतकानुशतकात एकदाच अवतरलेला हा मोहिनी अवतार!
(यावर्षी पुणे महानगरपालिकेतर्फे या संग्रहासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे.)
- सौ. अनुराधा राजहंस