Pune Police: दत्तवाडी पोलीस ठाणे नव्हे आता पर्वती पोलीस ठाणे
By विवेक भुसे | Published: June 16, 2023 10:29 AM2023-06-16T10:29:11+5:302023-06-16T10:30:31+5:30
पर्वती टेकडीचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्व विचारात घेऊन राज्य शासनाचा निर्णय
पुणे : स्वारगेट पोलीस ठाण्याचे विभाजन करुन निर्माण करण्यात आलेल्या दत्तवाडी पोलीस ठाण्याचे नवे नामकरण करण्यात आले असून त्याला आता पर्वती पोलीस ठाणे असे नाव देण्यात आले आहे. पर्वती टेकडीचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्व विचारात घेऊन राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत शासनाच्या कक्ष अधिकारी रुपाली कबरे यांनी हा आदेश काढला आहे.
पुणे शहरात स्वारगेट पोलीस ठाण्याची मोठी हद्द, सर्वाधिक झोपडपट्टा होत्या. वाढत्या गुन्हेगारीमुळे २००६ -०७ च्या दरम्यान स्वारगेट या एकाच पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांची नोंद एक हजारांहून अधिक झाली होती. वाढती गुन्हेगारी, जवळच असलेला ग्रामीण पोलीस दलाची हद्द लक्षात घेऊन २००७ मध्ये स्वारगेट पोलीस ठाण्याचे विभाजन करुन त्यातून दत्तवाडी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली होती. त्यासाठी पर्वती येथे नवीन इमारत बांधण्यात आली. स्वारगेट अंतर्गत पानमळा भागात अगोदरपासून दत्तवाडी पोलीस चौकी अस्तित्वात आहे. त्यामुळे दत्तवाडी पोलीस चौकी व दत्तवाडी पोलीस ठाणे यांच्या
नामसाधम्यामुळे तेथील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याबाबतचे निवेदन पोलीस महासंचालक कार्यालयाला मिळाली होती. त्याचा विचार करुन त्यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्याचे नाव बदलून पर्वती पोलीस ठाणे करण्याची विनंती केली. त्याअनुषंगाने शासनाने दत्तवाडीचे पर्वती पोलीस ठाणे असे नामकरण केले आहे.