विमानतळास इंचही जमीन देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:09 AM2021-06-27T04:09:12+5:302021-06-27T04:09:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भुलेश्वर : जिल्ह्यात बहुचर्चित असलेल्या पुरंदर तालुक्यातील छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न दिवसेंदिवस वादग्रस्त होत ...

Not even an inch of land will be given to the airport | विमानतळास इंचही जमीन देणार नाही

विमानतळास इंचही जमीन देणार नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

भुलेश्वर : जिल्ह्यात बहुचर्चित असलेल्या पुरंदर तालुक्यातील छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न दिवसेंदिवस वादग्रस्त होत आहे. पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पूर्व भागातील गावांवर विमानतळ लादल्याने बाधित शेतकरी आक्रमक झाले आहे. विमानतळास एक इंच देखील जागा देणार नसल्याचा महत्वपूर्ण ठराव शनिवारी (दि २६) नायगाव येथील बैठकीत घेण्यात आला. असाच ठराव बाधीत गावातील बैठकीत करण्यात येणार आहे.

पुरंदर तालुक्यातील रिसे, पिसे, राजुरी, नायगाव, पांडेश्वर व बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी, आंबी खुर्द या परिसरात विमानतळ होत असल्याचा बातम्या येऊ लागल्याने या परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत आपल्या जमिनी द्यायच्या नाहीत ही शेतकऱ्यांची ठाम भूमिका आहे. यासाठी नायगाव येथे ग्रामस्थांची बैठक शनिवारी (दि २६) घेण्यात आली. शेतकऱ्यांनी आपल्या भागात विमानतळ होण्यास तीव्र विरोध दर्शविला. एक इंचही जमीन विमानतळाला द्यायची नाही असा उपस्थितांच्या वतीने ठराव करण्यात आला.

नायगावचे सरपंच हरिदास खेसे म्हणाले, आमच्या जमिनी बागायती असताना जिरायती का दाखविल्या. पुढील विरोध कसा करायचा. मोर्चा, आंदोलन यासाठी आपण सर्वांनी पुढील दिशा ठरवायची आहे.

अनिल शेंडगे म्हणाले, पुरंदर तालुक्यातील मेमाणे पारगाव येथे विमानतळास विरोध दर्शावून जशी विमानतळाची जागा बदलण्यात आली त्याचप्रमाणे तीव्र विरोध करुन या भागातील जमिनी विमानतळास न देता विमानतळ बदलण्यात सरकारला भाग पाडू परंतु येथील बागायती जमीनी आम्ही देणार नाही.

चंद्रकांत चौंडकर म्हणाले विमानतळाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामसभांचे ठराव घ्या त्यानुसार विमानतळास तीव्र विरोध करा. महेश कड म्हणाले, विमानतळ विरोधी संघर्ष समितीचे पुरावे गोळा करण्याचे काम चालू आहे. शेवट पर्यंत विमानतळाला आमचा विरोध आहे. यामुळे काहीही झाले तरी विमानतळ होऊ देणार नाही. महेंद्र खेसे म्हणाले, विमानतळ आपल्याला गावात नको तसेच इतर गावातही नको. आपले क्षेत्र जिरायती दाखवले आहे ते बागायती आहे. शासनाला खोटी माहिती देण्यात आली आहे. यामुळे विमानतळास तीव्र विरोध करणे हे क्रमप्राप्त ठरणार आहे. पुरंदर उपसा व जनाई उपसा सिंचन योजनेमुळे आपला भाग सधन झाला आहे. सर्व पक्षीय जोडे बाजूला ठेऊन विमानतळाचे भूत हटऊया. शेतकरी पुत्र म्हणून माझा कायम विरोध आहे. विमानतळाविरोधात ट्रॅक्टर मोर्चे काढून विमानतळास तीव्र विरोध दर्शवू.

प्रदिप खेसे म्हणाले, विमानतळासंदर्भात निर्णय घेताना आमदारांनी विश्वासात घेतले नाही. त्यांनी त्यांचे राजकीय हितसंबंध जोपासले. पारगाव, चाकण येथील लोकांनी विरोध केला. त्यामुळे तेथील विमानतळ हाटले. त्यामुळे आपणही विरोध करून विमानतळ हाटऊया. हा विषय गांभीर्याने घेणे घरजेचे आहे. या बाबत आमदारांना विरोधाचा ठराव देऊ. यशवंत कड म्हणाले, आम्हाला परदेशात जायचे नाही. आम्हाला विमानतळ नको. आमदार, खासदार,आपल्या विरोधात जाणार नाही. जन्मभूमी, मातृभूमी सोडायची नाही. विलास खेसे म्हणाले, नायगावमधली इंच भरही जमीन आम्ही देणार नाही असा सर्वानुमते ठराव करूयात आणि विमानतळ हटवूया. यावेळी गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो : नायगाव(ता. पुरंदर) येथे विमानतळास विरोध करताना ग्रामस्थ.

Web Title: Not even an inch of land will be given to the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.