पुण्यात १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण नाही, हे महापालिकेचे घातकी धोरण: आमदार चेतन तुपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 06:10 PM2021-04-29T18:10:35+5:302021-04-29T18:11:15+5:30
तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सरसकट लसीकरण व्हावे
पुणे: केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांच्या सरसकट लसीकरणाला परवानगी दिली आहे. त्यानंतर राज्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १८ ते ४४ मध्ये वर्गवारी करणार असल्याचे सांगितले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने सध्यातरी १८ वर्षांवरील सर्वांना १ मे पासून लस मिळणार नसल्याचे जाहीर केले. पुणे महानगरपालिकेचे हे धोरण घातकी असून कोरोनाला आळा घालण्यासाठी सर्वांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. महापालिका आयुक्तांना अशी विधायक सूचना केली असल्याचे आमदार चेतन तुपे यांनी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. तज्ञांकडून तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तिला रोखण्यासाठी दोन महिन्यात लसीकरण मोहीम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. असेही यावेळी ते म्हणाले.
पुण्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे आणि अंकुश काकडे व राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी महापालिका आयुक्त यांची भेट घेतली. त्यांनतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शहरात लसीकरण केंद्राबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. केंद्रावर लसींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. पर्याय नसल्याने लोकांना लस न घेता माघारी फिरावे लागत आहे. केंद्रावर लसींचे समान वाटप का होत नाही. असा प्रश्न त्यांनी आयुक्तांसमोर उपस्थित केला.
पुढे ते म्हणाले, आतापर्यंत ६ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यांना अजून दुसरा डोस देणे बाकी आहे. दुसऱ्या डोसबरोबरच नवीन लस घेणाऱ्यांनाही प्राधान्य द्यावे. त्या नियोजनाबाबत राष्ट्रवादी आर्थिक मदतीबरोबरच मनुष्यबळ पुरवण्यासही तयार आहे. यावरून नियोजन करण्याबाबत आयुक्तांशी चर्चा झाली आहे. त्यावरच आम्ही काही विधायक सूचनाही दिल्या आहेत.
पुण्याची भौगोलिक रचना पाहता १८२ केंद्र कमी वाटत आहेत. काही भागात चार तर काही ठिकाणी एकच केंद्र असल्याने नागरिकांची विनाकारण धावपळ होत आहे. अशा परिस्थितीत १२ हजार नागरिकांच्या मागे १ केंद्र असावे. असे आम्ही सांगितले आहे.
पुणे महानगरपालिका सध्या आरोग्य सुविधेवर २ कोटी खर्च करत आहे. आता लसीकरणासाठी त्यांना ३६ कोटी लागणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, आमदार विकास निधीतून आर्थिक साहाय्य करण्यास तयार आहेत. तसेच महापालिकेच्या ताब्यात असलेल्या अनेक जागा धूळखात पडून आहेत. अधिकाऱ्यांमार्फत त्या जागांची चौकशी करावी. त्याठिकाणी कोव्हिडं केअर सेंटर उभारण्याची मागणीही त्यांनी केली आहे.