‘उत्कृष्ट संसदपटू नव्हे, तर सेल्फीपटू’, विजय शिवतारेंची खासदार सुळे यांच्यावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 12:57 AM2018-12-04T00:57:47+5:302018-12-04T00:58:06+5:30
आपण ‘उत्कृष्ट संसदपटूऐवजी उत्कृष्ट सेल्फीपटू नक्कीच व्हाल’ अशी टीका जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र लिहून केली आहे.
जेजुरी : आपण ‘उत्कृष्ट संसदपटूऐवजी उत्कृष्ट सेल्फीपटू नक्कीच व्हाल’ अशी टीका जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र लिहून केली आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, याबाबत सुप्रिया सुळेंना विचारले असता असे कुठलेही पत्र मिळाले नसल्याचे सांगत असे पत्र आल्यास त्याला योग्य उत्तर देणार असल्याचे त्या म्हणाल्या. मात्र, या पत्रामुळे तालुक्यातील राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली आहे.
पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. निवडणुकांपूर्वी वातावरणनिर्मिती करण्यास सर्वच राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. यात सर्वांत स्वस्त आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे राजकीय पक्ष समाजमाध्यमांचा वापरही करू लागले आहेत. राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून लिहिलेल्या टीकात्मक पत्रात सुळे यांनी केलेल्या आंदोलनांची टर उडविण्यात आली आहे.
राज्यमंत्री शिवतारे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात सेल्फी आंदोलनाबाबत टीका करत आपण ‘उत्कृष्ट संसदपटूऐवजी उत्कृष्ट सेल्फीपटू नक्कीच व्हाल’ असे म्हटले आहे. मी स्वत: धावपळ करून या मतदारसंघात विविध विकासकामे मंजूर करून आणतो. काम मंजूर झाल्याची माहिती सुप्रिया सुळे अधिकाऱ्यांकडून घेतात. काम सुरू होण्यापूर्वी त्या तेथे जाऊन सेल्फी काढून एखादे आंदोलन करतात आणि आपल्या आंदोलनामुळेच हे काम होत असल्याचा समज जनतेत निर्माण करून देतात. त्यांचे हे तंत्र आपल्या लक्षात आले असून, आपण खासदार म्हणून कोणती कामे केली त्यांची सेल्फीच्या माध्यमातून समाजाला माहिती द्यावी. त्यासाठी ‘सेल्फी विथ सुप्रिया सुळेज वर्क्स’ अशी एखादी मोहीम राबवावी, असे उपहासात्मक आवाहनही केले आहे. सेल्फीच्या माध्यमातून आंदोलने, आरोग्य शिबिरे, जिल्हा परिषदेच्या सायकली वाटायला खासदार होण्याची गरज नाही. अशी कामे तर कोपºयावरील गणेश मंडळांचे अध्यक्षही करतात, अशी टीका करताना त्यांनी खासदार म्हणून आपण आपल्या मतदारसंघात कोणती कामे केली ती लोकांसमोर ठेवण्याचे आवाहन शिवतारे यांनी या खुल्या पत्रातून केले आहे. हे पत्र सध्या व्हॉट्सअॅप, फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र फिरत आहे.
>या पत्राबाबत खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र हे खुले पत्र अजून तरी आपल्याला मिळालेले नाही. सोशल मीडियातील पत्रावर कोण विश्वास ठेवणार? प्रत्यक्ष पत्र मिळाल्यावर मला जे उत्तर द्यायचे ते मी जरूर देईन, अशी प्रतिक्रिया दिली आहे.