‘फास्ट गो’ नव्हे ही तर ‘गो स्लो’ यंत्रणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 02:11 PM2019-12-16T14:11:39+5:302019-12-16T14:17:46+5:30

टोलनाक्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप

Not 'fast go' but 'go slow' system | ‘फास्ट गो’ नव्हे ही तर ‘गो स्लो’ यंत्रणा

‘फास्ट गो’ नव्हे ही तर ‘गो स्लो’ यंत्रणा

googlenewsNext
ठळक मुद्देपहिल्याच दिवशी नियोजन कोलमडले :नेटवर्क नसल्याने टोल घेण्यास विलंब राज्यातील सर्वच टोल नाक्यावर फास्टॅगची सुविधा रविवारपासून सुरूदिव्यांगांच्या वाहनांना किंवा विशिष्ट व्यक्तींना यापूर्वी टोलमध्ये सवलत

खेड -शिवापूर :  टोल नाक्यावरील वाहनांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी तसेच वाहनांचा वेग वाढविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राज्यातील सर्वच टोल नाक्यावर फास्टॅगची सुविधा रविवारपासून सुरू केली. पुणे जिल्ह्यात मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग, जुना मुंबई- पुणे मार्ग, खेडशिवापुर, पाटस टोलनाका, राजगुरूनगर येथील टोल नाक्यावर ही यंत्रणा सुरू करण्यात आली. मात्र, नेटवर्क नसल्याने तसेच अनेक वाहनचालकांनी फास्टटॅग न लावल्याने तसेच टोलनाक्यावर लेनचे योग्य नियोजन नसल्याने ही यंत्रणा पहिल्याच दिवशी प्रवाशांसाठी ' फास्ट गो न ठरता गो स्लो ' यंत्रणा ठरली. यामुळे टोलनाक्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. 
महामार्गावर असणाºया टोलनाक्यावर सुविधा नसल्याने टोलनाक्यावर वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागत होत्या. टोलनाक्यावर जाणारा वेळ कमी करण्यासाठी ३ मिनिटांत वाहने सोडणे बंधनकारक केले होते. असे न झाल्यास टोल माफची घोषणा शासनाने केली होती. मात्र, ही घोषणाही हवेत विरली. यानंतर वेगाने टोलवसूनलीसाठी फास्टगो यंत्रणा राष्ट्रीय महार्गा प्राधिकरणाने राज्यातील सर्वच टोल नाक्यावर राबविण्याची घोषणा केली होती. ही यंत्रणा १ डिसेंबरपासून लागू होणार होती. मात्र, अनेक टोल यासाठी सज्ज नसल्याने मुदत वाढ देऊन रविवार पासून (दि १५) पासून ही यंत्रणा सुरू होणार होती. पुणे जिल्ह्यात मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग, जुना मुंबई-पुणे मार्ग, खेडशिवापुर, पाटस टोलनाका, राजगुरूनगर येथील टोल नाक्यावर ही यंत्रणा सुरू करण्यात आली. मात्र, अनेक ठिकाणी लेनचे नियोजन नसल्याने टोलवरील वाहतूक ही संथगतीने होत असल्याने टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ही यंत्रणा आॅनलाईन असल्याने अनेक टोलनाक्यावर नेटवर्कच नसल्याचे प्रकार घडले. यामुळे वाहने पाच ते सात मिनिटे एकाच ठिकाणी थांबून होती. यामुळे टोल घेण्यास विलंब लागत होता. खेड शिवापुर टोलनाक्यावर ही यंत्रणा रविवारी मध्यरात्री पासून सुरू करण्यात आली.  मात्र ही सुविधा ज्या गोष्टी साठी उभारण्यात आली तो हेतू मात्र या ठिकाणी साध्य होताना दिसत नव्हता. फास्ट टॅग सक्तीचे केल्या नंतरही तसेच १५ दिवसांची मुदत वाढ देऊनही  बहुतांशी गाडी मालकांकडून आपल्या गाड्यांना फास्ट बसवण्यात न आल्याकारणाने खेड-शिवापूर टोल नाक्यावर बराचसा विस्कळीतपणा जाणवला.  एकूण दहा पैकी फास्ट टॅगसाठी पाच व रोखीने टोल भरणा करणा-यांसाठी प्रत्येकी पाच लेन राखीव केल्या आहेत. अशा पद्धतीची माहिती शनिवारी टोल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती.  मात्र, ती राबवण्यात व्यवस्थापन कमी  पडल्याचे चित्र जाणवले.   सकाळपासून कोणतीही गाडी कुठल्याही  लेनमध्ये जात असल्याने  तसेच लेन बाबत स्पष्टता नसल्याने  सर्वत्र गोंधळाचे वातावरण या ठिकाणी दिसत होते. फास्ट टॅग लेन मधून जाणा-या  वाहनावर फास्ट टॅगची  चिप असून सुद्धा केवळ नेटवर्कच्या अडचणीमुळे  वाहने पुढे जाण्यास विलंब लागत होता.  त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या.  काही ठिकाणी फास्ट  टॅग असुनही नेटवर्क नसल्याने वाहन चालकांची गैरसोय होत होती.  हीच अवस्था खेड तालुक्यातील राजगुरूनगर टोलनाक्यावर व दौंड तालुक्यातील पाटस टोलनाक्यावर दिसून आली. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर फास्ट टॅगनुसार टोल वसुली सुरू झाली असली तरी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अजून सुरुवात झालेली नाही. एक-दोन लेनवर प्रातिनिधिक स्वरुपात फास्टटॅग लावले असून, सर्व लेनवरील काम पूर्ण झाल्यानंतर मध्यरात्रीपासून फास्टटॅगनुसार टोलवसुली केली जाणार आहे.
.............
आधी पायाभूत सुविधा द्या
ही यंत्रणा जरी वाहनचालकांच्या दृष्टीने सोयीची असली तरी ही यंत्रणा यशस्वी करण्यासाठी सर्वप्रथम महामार्गावरील टोलनाक्यांवर पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. रोखीने भरण्यात येणारी टोेल लेन आणि फास्ट टॅगची लेन या बाबत प्रवाशांमध्येही संभ्रमावस्था होती. यामुळे कुणीही कुठल्याली लेनमध्ये वाहने दामटत होती. यामुळे आणखी गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याने आधी पायाभूत सुविधा द्या त्यानंतरच ही यंत्रणा लागू करा असा सुर प्रवाशांच्या होता.  
 स्थानिकांना पडणार भुर्दंड
स्थानिक नागरिकांना व वाहनचालकांना यापूर्वी या टोलमधून  जी सवलत देण्यात येत होती ती सवलत यापुढे बंद होणार आहे.  सर्व स्थानिक वाहनचालकांकडून महिन्याला २६५ रुपयांचा टोल खेड-शिवापूर टोलनाक्यावर आकारण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक वाहनचालकांनमध्ये फास्टगोबद्दल नाराजी आहे
.......
दिव्यांगांच्या वाहनांना किंवा विशिष्ट व्यक्तींना यापूर्वी टोलमध्ये सवलत देण्यात आली होती. ती सवलत यापुढे कायम राहणार का? याबाबतही टोल प्रशासन अनभिज्ञ आहे. तसेच कर्मचाºयांची याबाबत संवाद साधला असता त्यांनाही याबद्दल खात्रीशीर असं काही माहित नसल्याने या यंत्रणेबाबत सर्वच पातळीवर गोंधळाचे वातावरण असल्याचे पहिल्या दिवशी स्पष्ट झाले.   

Web Title: Not 'fast go' but 'go slow' system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.