"पुण्यातील मॅचसाठीचे तिकीट मिळेना, अडचण येतेय"; रोहित पवारांनी दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 01:49 PM2023-10-12T13:49:23+5:302023-10-12T14:08:15+5:30
गहुंजे येथे क्रिकेट विश्वचषकातील होणाऱ्या क्रिकेट सामन्यांसाठीही तिकीटींची विक्री ऑनलाईन सुरू आहे.
पुणे/मुंबई - यंदाच्या वर्ल्डकपमध्ये रंगतदार सामने सुरू आहेत. भारताने पहिल्या दोन्ही सामन्यांत चाहत्यांची अपेक्षापूर्ती केली. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय मिळवला. तर, दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानवर एकतर्फी विजय मिळवत संघाची ताकद दाखवून दिली. आता, सर्वांचे लक्ष तिसऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्याकडे लागले आहे. त्यासाठी, तिकीट विक्री फुल्ल झाली असून वर्ल्डकपमधील एखादं सामना पाहावा, म्हणून क्रिकेटप्रेमी ऑनलाईन तिकीटांसाठी बुकींग करत आहेत. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवरही ५ सामने होत आहेत.
गहुंजे येथे क्रिकेट विश्वचषकातील होणाऱ्या क्रिकेट सामन्यांसाठीही तिकीटींची विक्री ऑनलाईन सुरू आहे. मात्र, या तिकीट विक्रीसाठी तांत्रिक अडचणी येत आहेत. म्हणून, पुण्यातील व महाराष्ट्रातील क्रिकेटप्रेमींनी एमसीएचे अध्यक्ष रोहित पवारांकडे गाऱ्हाणे मांडले होते. यासंदर्भात रोहित पवारांनी दखल घेत, हा विषय आयसीसीच्या संदर्भातील आहे, त्यात एमसीएचा काहीही रोल नसल्याचे म्हटले. तसेच, मी संबंधित विषयात लक्ष घातले असून मेसेज योग्य ठिकाणी पाठवला आहे, असेही रोहित पवार यांनी म्हटलंय.
पुण्यात होणाऱ्या #ICC_World_Cup क्रिकेट सामन्यांच्या तिकिटासंदर्भात अनेकजण विचारणा करतायेत. ऑनलाईन तिकिट मिळताना काही अडचणी येत आहेत, हे खरं आहे, मात्र तिकीट विक्री ही #MCA च्या अखत्यारीत येत नाही तर सर्व नियंत्रण हे #ICC कडं आहे. त्यामुळं तिकीटासंदर्भात तुम्हाला येणाऱ्या…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 12, 2023
पुण्यात होणाऱ्या ICC_World_Cup क्रिकेट सामन्यांच्या तिकिटासंदर्भात अनेकजण विचारणा करतायेत. ऑनलाईन तिकिट मिळताना काही अडचणी येत आहेत, हे खरं आहे. मात्र, तिकीट विक्री ही MCA च्या अखत्यारीत येत नाही तर सर्व नियंत्रण हे ICC कडं आहे. त्यामुळं तिकीटासंदर्भात तुम्हाला येणाऱ्या अडचणींबाबतचा मेसेज योग्य ठिकाणी पोचवला जाईल, असे रोहित पवार यांनी ट्विट करुन सांगितले.
पुण्यात ५ सामने, पहिला सामना १९ ऑक्टोबरला
पुण्यातील गहुंजे मैदानावरील पाचपैकी चार सामने हे डे-नाईट होणार आहेत. तर, एक सामना दिवसा खेळवला जाणार आहे. १९, ३० ऑक्टोबर, १ आणि ८ नोव्हेंबर रोजी दिवस-रात्र सामने खेळवले जाणार आहेत. तर ११ नोव्हेंबर रोजी एकमेव सामना दिवसा होणार आहे.
पुणे महापालिकेनं केली बसची सोय
गहुंजे स्टेडियमवरील सामने पाहण्यासाठी पुणे मनपा भवन येथूनल सकाळी ११, ११.३५, १२.०५ यावेळेला बस सुटतील. तर, कात्रज बायपास येथून सकाळी ११ आणि साडेअकरा वाजता बस सुटेल. तर, निगडी टिळक चौकातून दुपारी १२ आणि साडेबारा वाजता बस सुटणार आहे
डे-नाईट सामन्यासाठी मनपा भवन येथून सकाळी ८.२५, ८.५०, ९.०५ अशा तीन बस सोडण्यात येतील. तर, कात्रज बायपास येथून सकाळी ८.१५ व ८.३५ या दोन बस असणार आहेत. निगडी टिळक चौकातूनही सकाळी साडेआठ व नऊ वाजता बस सुटणार आहे.