रावण यांना लिहिलेले ढवळे यांचे पत्र देण्यास न्यायालयाचा तुर्त नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 08:18 PM2018-12-21T20:18:52+5:302018-12-21T20:29:05+5:30
कोरेगाव भिमा येथे अॅड. चंद्रशेखर रावण हे शौर्य दिनासाठी पुण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ढवळे यांनी एक पत्र लिहले आहे.
पुणे : बंदी असलेल्या सीपीआय माओवादी या संघटनेशी संबंध असल्याचा आरोपावरून अटकेत असलेले सुधीर ढवळे यांनी भीम आर्मीचे संस्थापक अॅड. चंद्रशेखर रावण यांना लिहलेले पत्र त्यांना सुपुर्द करण्यास न्यायालयाने तुर्त नकार दिला आहे.
अॅड. चंद्रशेखर रावण हे कोरेगाव भिमा शौर्य दिनासाठी पुण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ढवळे यांनी एक पत्र लिहले आहे. ते पत्र न्यायालयाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या वकिलांद्वारे रावण यांना देण्यात यावे, अशी मागणी ढवळे यांनी केली होती. ती मागणी विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांनी नामंजूर करीत स्पष्ट केले की, कोरेगाव भिमा शौर्य दिनात कोणताही गोंधळ होवू नये यासाठी खबरदारी म्हणून तुर्तास ते पत्र देता येणार नाही. त्यामुळे पत्रावर जिल्हा सरकारी वकील उज्जला पवार यांचा से दाखल झाल्यानंतर पत्रावर पुन्हा निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती बचाव पक्षाचे वकील सिद्धार्थ पाटील यांनी दिली. दरम्यान अॅड. पवार या ४ जानेवारी रोजी यावर से देणार आहे. त्यामुळे संबंधित पत्र रावण यांना शौर्य दिन झाल्यानंतर मिळणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नव पेशवाईचे वारसदार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) विचारधारेची अमंलबजावणी करण्यासाठी ते पुणे पोलिसांना देखील सीबीआयप्रमाणे पिंज-यातील पोपट बनवले आहे, असा उल्लेख या पत्रात आहे. ढवळे यांनी लिहलेल्या या पत्रावर त्यांच्यासह अॅड. सुरेंद्र गडलिंग, अॅड. सुधा भारद्वाज, महेश राऊत, रोना विल्सन यांच्या सह्या आहेत.