आरोग्य कर्मचाऱ्यांचेच नाही अजून लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:08 AM2021-07-21T04:08:46+5:302021-07-21T04:08:46+5:30
पुणे : देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले. आजपर्यंत ७९ टक्के ...
पुणे : देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले. आजपर्यंत ७९ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचा पहिला डोस, तर ५६ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचा दुसरा डोस झालेला आहे. एकीकडे तिसऱ्या लाटेचा इशारा दिला जात असतानाच १०० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. या गतीने लसीकरणाचे लक्ष्य कधी गाठले जाणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर लसीकरणाची प्रक्रिया सुरु झाली. सध्या कोरोनाची साथ रोखण्याचा लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याचे सांगितले जात आहे. लसींच्या पुरवठ्याबाबत स्थानिक प्रशासनाच्या अडचणी अद्याप संपलेल्या नाहीत. शहरातील बरीच लसीकरण केंद्रे लसींचे डोस न आल्याने आठवड्यातील दोन-तीन दिवस बंद ठेवावी लागत आहेत. पहिल्या टप्प्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनाच अद्याप शंभर टक्के लस मिळाली नसेल तर इतर वर्गांचे लसीकरण केव्हा पूर्ण होणार आणि त्यासाठी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार, याचे गणित मांडून लसीकरणाचा वेग वाढवाला लागणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला एक मार्चपासून सुरुवात झाली. आतापर्यंत ८९ टक्के कर्मचाऱ्यांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. तर, ५२ टक्केच कर्मचाऱ्यांनाच दुसरा डोस मिळाला आहे. तिसऱ्या लाटेच्या प्राथमिक टप्प्याला सुरुवात झाल्याचे सूतोवाच जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे. तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करायची तर ६० वर्षांवरील नागरिक, ४५-६० वयोगट तसेच १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण वेगाने होणे गरजेचे असल्याचे वैद्यकतज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याआधी लॉकडाऊनच्या काळातही आपली सेवा बजावणाऱ्या आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाला नियोजन करावे लागणार आहे.
----------------
एकूण आरोग्य कर्मचारी - १,९८,३१९
पहिला डोस किती जणांनी घेतला? - १,५६,६८६
दोन्ही डोस घेणारे - १,११,३७४
--------------
फ्रंटलाईन वर्कर्स - २,८४,३७७
पहिला डोस किती जणांनी घेतला? - २,५२,५७१
दोन्ही डोस घेणारे - १,४६,५८२
--------------------
सुरुवातीच्या काळात लस घेण्याबाबत बराच संभ्रम आणि गैरसमज होता. त्यामुळे सुरुवातीच्या काळात लस घेणाऱ्यांचे प्रमाण कमी होते. हळूहळू अनेक जण आपणहून लसीकरणासाठी पुढे येऊ लागले. अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना गेल्या सहा-सात महिन्यांमध्ये कोरोनाची लागण झाल्याने लसीचा डोस घेण्यास तीन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली. कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये ८४ दिवसांचे अंतर असल्यानेही अद्याप शंभर टक्के लसीकरण पूर्ण झालेले नाही.
- डॉ. संजय देशमुख, उपसंचालक (आरोग्य), पुणे विभाग