हा माझा नव्हे, तर भारताचा सन्मान - माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 03:04 AM2019-06-02T03:04:28+5:302019-06-02T03:04:57+5:30
मेक्सिको सरकारकडून ‘ऑर्डन मेक्सिकाना डी अॅग्यूइला झटेका’ सन्मान
पुणे : मेक्सिको सरकारने केलेल्या सन्मानामुळे मी भारावून गेले आहे. हा दोन्ही देशांमधील मैत्रीचा सन्मान आहे. हा केवळ माझा नव्हे, तर भारताचा सन्मान असल्याची कृतार्थ भावना माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केली.
मेक्सिको सरकारचा प्रतिष्ठेचा ‘ऑर्डन मेक्सिकाना डी अॅग्यूइला झटेका’ हा राष्ट्रीय पुरस्कार मेक्सिकोच्या भारतातील राजदूत सेन्यूया मेलबा प्रिया यांच्या हस्ते प्रतिभाताई पाटील यांनी स्वीकारला. मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजच्या सभागृहात शनिवारी हा कार्यक्रम झाला. ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. एस. के संचेती, सिंबायोसिस’चे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी आदी मान्यवर सोहळ्याला उपस्थित होते.
मेक्सिकोशी मानवतावादी परस्पर संबंध दृढ करणाऱ्या परदेशी नागरिकाचा मेक्सिको सरकारतर्फे सन्मान करण्यात येतो. अनेक वर्षांनी या पुरस्कारासाठी एका भारतीय व्यक्तीची निवड करण्यात आली. सेन्यूया मेलबा प्रिया म्हणाल्या, प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना दोन्ही देशांदरम्यान असलेले संबंध अधिक दृढ झाले. त्यांचे हे योगदान आम्ही विसरलेलो नाही.
सत्काराला उत्तर देताना प्रतिभाताई यांनी या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मेक्सिको सरकारचे आभार मानले. हा दोन्ही देशांमधील मैत्रीचा सन्मान आहे. या पुरस्काराने खूप भारावून गेले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांनी मेक्सिकोमधील आठवणींना उजाळा दिला. २००७ मध्ये मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताला भेट दिली होती. त्यानंतर राजकीय, आर्थिक संबंध अधिक दृढ कसे करता येतील या दृष्टिकोनातून उद्योग क्षेत्रातील काही प्रतिनिधींचे शिष्टमंडळ मेक्सिकोला पाठविले होते. आपण एकत्रितपणे कोणते उपक्रम करू शकतो, याची त्यांच्याकडून माहिती घेतली. २००८ मध्ये मेक्सिकोच्या भेटीनंतर दोन्ही देशांमध्ये काही विषयांसंबंधी करार करण्यात यशस्वी ठरले, याचा आनंद असल्याचे पाटील यांनी सांगितले.
स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मेक्सिकोच्या राजदूतपदी विजयालक्ष्मी पंडित यांची निवड केली आणि तेव्हापासून या दोन्ही देशांमध्ये ऋणानुबंध जुळले असल्याचा आवर्जून उल्लेख प्रतिभाताई पाटील यांनी केला.