सुवर्णकाळातलाच नव्हे सार्वकालिक सर्वोच्च ‘डी-जोकर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:15 AM2021-06-16T04:15:18+5:302021-06-16T04:15:18+5:30

----------------------- शिडशिडीत शरीरयष्टीचा नोवाक दिसतो मरतुकडा, पण त्याच्यात इतका दम आहे की सलग चार-चार तास तो प्रतिस्पर्ध्याला सहजपणे झुंजवतो. ...

Not only in the golden age, but also the supreme 'D-Joker' of all time. | सुवर्णकाळातलाच नव्हे सार्वकालिक सर्वोच्च ‘डी-जोकर’

सुवर्णकाळातलाच नव्हे सार्वकालिक सर्वोच्च ‘डी-जोकर’

Next

-----------------------

शिडशिडीत शरीरयष्टीचा नोवाक दिसतो मरतुकडा, पण त्याच्यात इतका दम आहे की सलग चार-चार तास तो प्रतिस्पर्ध्याला सहजपणे झुंजवतो. भले त्याच्याकडे राफेल नदालचा जोरकसपणा, ताकद नसेल, रॉजर फेडररची नजाकत नसेल पण चिवटपणा, तंदुरुस्ती याबाबतीत नोवाक या दोघांपेक्षाही काकणभर कणखरच म्हणावा लागतो. रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच हे तिघेही एकमेकांपेक्षा अगदी भिन्न शैलीचे खेळाडू गेले सुमारे एक तप एकमेकांविरोधात झुंजताना पाहायला मिळणे ही टेनिस रसिकांसाठी मेजवानीच आहे. यातल्या रॉजर आणि राफेल या दोघांनी तर प्रत्येकी वीस ग्रँडस्लॅमवर नाव कोरले आहे. कालच ‘फ्रेंच ओपन’ जिंकून जोकोविचने वैयक्तिक ग्रँडस्लॅम विजेतेपदांची संख्या एकोणीसवर नेऊन ठेवली आहे. या त्रिमूर्तीमध्ये नोवाक सगळ्यात लहान. त्याचा सध्याचा धडाका लक्षात घेतला तर तो ‘ऑल टाईम ग्रेट’ होणार यात शंका नाही. ग्रँडस्लॅम विजेतेपदांच्या केवळ संख्येमुळे तो महान ठरणार नाही. तर एकाच वेळी वीस ग्रँडस्लॅम जिंकणारे दोन ‘ग्रेट्स ऑफ द गेम’ कोर्टवर असताना त्यांच्याशी लढत, या दोन महायोद्ध्यांना नमवत एकोणीस ग्रँडस्लॅम जिंकणे यात नोवाकची थोरवी आहे.

शरीराने जितका नोवाक चिवट तितकाच मनानेही तो मजबूत आहे. १९८७ मध्ये त्याचा जन्म झाला तेव्हा सर्बियात रणगाड्यांची धडधड आणि कुठेही, कधीही होणारे बॉम्बस्फोट ही आम बात होती. युगोस्लाव्हियातल्या यादवीत वयाच्या चौथ्या वर्षी नोवाकने स्टेनगन हाती धरली असती किंवा तो अगदी ड्रगच्या कचाट्यात सापडला असता तरी तो नियतीला दो. देऊ शकला असता. पण नोवाकने टेनिसची रॅकेट जवळ केली. बाळपणीचा छंद त्याचे ‘करिअर’ बनले आणि पाहता, पाहता त्याची दौड टेनिसमधल्या सार्वकालिक सर्वोच्च शिखराकडे चालू झाली. वयाच्या अठराव्या वर्षी नोवाकने व्यावसायिक टेनिसपर्यंत बाजी मारली. येथवरचा त्याचा प्रवासही चमकदार युवा खेळाडू होता. त्यानंतर तर त्याने ग्रँडस्लॅम जिंकण्याचा सपाटा लावला. तेव्हापासून त्याची कमान सातत्याने चढती राहिली आहे. हा यशाचा मार्ग नशिबाच्या बळावर सर होत नसतो. यात योगायोग तर अजिबात नसतो. पॅरिमसधल्या रोलँड गॅरोसच्या लाल मातीवर कालच्या रविवारी नोवाकने जो चमत्कार केला तो अवर्णनीय होता. एक तर ‘फ्रेंच ओपन’ची अंतिम फेरी त्याने गाठली तीही ‘क्ले कोर्ट’वरच्या बादशहाला, नदालला संघर्षपूर्ण सामन्यात नमवून. त्यानंतर अंतिम सामन्यातही ग्रीसच्या तरण्याताठ्या स्टेफानॉसने पहिल्या दो. सेट्समध्ये जेव्हा नोवाकला हरवले तेव्हा ‘फ्रेंच ओपन’ला यंदा नवा विजेता मिळणार असेच टेनिस प्रेमींना वाटले. पण आपल्यापेक्षा बारा वर्षांनी लहान असलेल्या स्टेफानॉसला नोवाकचा धडाका पेलवला नाही आणि सरतेशेवटी नोवाकने विक्रमी विजेतेपद मिळवले. चार-साडेचार तासांच्या दीर्घ लढती खेळणे आणि त्यात प्रतिस्पर्ध्याचा पुरता शक्तिपात करुन त्याला हरवण्याची सवयच जणू नोवाकला जडली आहे. प्रतिस्पर्ध्याविरोधात कडवा असणारा नोवाक कोर्टवर तितकाच मिश्कील असतो. म्हणूनच ‘डी-जोकर’ ही त्याची आणखी एक ओळख आहे. ‘फ्रेंच ओपन’ जिंकल्यावर नोवाकने लगेचच त्याची विजयी रॅकेट मैदानातल्या एका लहानग्या प्रेक्षकाला देऊन टाकली. कधी तो उन्हात थांबणाऱ्या बॉलबॉयला स्वत:कडचे ‘ड्रिंक’ देतो किंवा स्वत:च्या छत्रीत घेतो. मैदानात तो खूप चुरशीने खेळतो, पण तो चिडखोर नाही. सामना कोणत्याही स्थितीत असला तरी स्वच्छ मनाने हसण्याची दुर्मिळ निरागसता तो मैदानातही सहज दाखवू शकतो. हे सगळे येते कुठून? मानसिक कणखरतेविषयी, ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी नोवाक योगसाधना करतो. त्यातून मनावर ताबा मिळवायला तो शिकला. खेळासाठी लागणारी शारीरिक आणि मानसिक कणखरता अंगी असणाऱ्या नोवाकला टेनिसमधला ‘सुपर ह्युमन’ म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरत नाही. आता नोवाकची नजर आहे विम्बल्डनच्या हिरवळीवर आणि त्यानंतर ऑलिम्पिकमधल्या सुवर्णपदकावर. गुडघेदुखीने त्रस्त असलेला ‘ग्रास कोर्टवरचा राजहंस’ रॉजर फेडरर आता चाळिशीच्या उंबरठ्यावर आहे. विम्बल्डनच्या रुपाने विक्रमी एकविसावे ग्रँडस्लॅम जिंकून त्याला त्याच्या स्वप्नवत कारकिर्दीची अखेर करायची आहे. पण त्याच्यापुढे नोवाकचे कडवे आव्हान असेल. विम्बल्डनमध्ये आता फेडरर-नोवाक यांच्यात अंतिम फेरीचा थरार रंगावा हेच स्वप्न प्रत्येक टेनिसप्रेमी पाहतोय. टेनिसमधल्या सुवर्णकाळाचा हा सर्वोच्च क्षण ठरेल.

Web Title: Not only in the golden age, but also the supreme 'D-Joker' of all time.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.