महाराष्ट्राचेच नव्हे, तर उभ्या भारतवर्षाचे दैवत; पुण्यात ब्रिटिश भारतातील शिवरायांचा पहिला अश्वारूढ पुतळा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 05:40 PM2023-04-12T17:40:23+5:302023-04-12T17:40:40+5:30

भरदार छातीचे, देखण्या मुद्रेचे अन् घोड्यावरून धाव घेण्यासाठी सज्ज झालेले छत्रपती शिवाजी महाराज

Not only the god of Maharashtra but also of India The first equestrian statue of Lord Shiva in British India in Pune | महाराष्ट्राचेच नव्हे, तर उभ्या भारतवर्षाचे दैवत; पुण्यात ब्रिटिश भारतातील शिवरायांचा पहिला अश्वारूढ पुतळा

महाराष्ट्राचेच नव्हे, तर उभ्या भारतवर्षाचे दैवत; पुण्यात ब्रिटिश भारतातील शिवरायांचा पहिला अश्वारूढ पुतळा

googlenewsNext

राजू इनामदार

पुणे: काळ अव्वल ब्रिटिश अमदानीचा... पहिले महायुद्ध सुरू झालेले... इंग्रजांना हवे होते सैनिक... छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचेच नव्हे, तर उभ्या भारतवर्षाचे दैवत... राजर्षी शाहूंनी इंग्रजांची अडचण ओळखली व महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्याचा संकल्प मान्य करून घेतला. त्यांच्या अथक प्रयत्नांमधून ब्रिटिश काळात ब्रिटिश अंमलदारांच्या उपस्थितीत भारतातील हा पहिला अश्वारूढ पुतळा श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलच्या आवारात उभा राहिला. आज तो पुण्याचा अभिमान बनला आहे.

हा पुतळा म्हणजे शिल्पकलेतील शान आहे. साडेतेरा फूट उंच, १३ फूट लांब व साडेतीन फूट रुंद, असा पुतळा सौष्ठव, सौंदर्य व सुबकता यातील मानदंड आहे. महाराजांच्या हातातील तलवार ५४ इंचांची आहे. त्याचे वजन ८ टनांपेक्षा जास्त आहे. संपूर्ण पुतळा धातू वितळवून तो एका साच्यात ओतून तयार केला आहे. असे एकसंध ओतकाम करण्यासाठी काय कौशल्य लागते व किती सायास करावे लागतात याची माहिती घेतल्यावर शिल्पकार विनायक करमरकर यांना सलाम करावा वाटतो.

इंग्रजांना वाटत होते पुतळा इंग्रज शिल्पकाराने तयार करावा. मात्र, राजर्षींची इच्छा होती की, हे काम भारतीय शिल्पकाराने करावे. तत्कालीन प्रसिद्ध शिल्पकार गणपतराव म्हात्रे व त्यावेळी म्हणजे सन १९१९ ला वगैरे जेजे स्कूलमधून शिल्पशास्त्राची पदवी घेऊन नुकतेच बाहेर पडलेले विनायकराव करमरकर यांनी हे काम हाती घेतले. पुढे गणपतराव यातून बाहेर पडले. करमकरांवर सर्व जबाबदारी आली. ती त्यांनी अशा पद्धतीने पार पाडली की, त्यानंतर ते छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यासाठीच प्रसिद्ध झाले.

यातल्या अश्वाचे पाय अशा पद्धतीने आहेत की संपूर्ण पुतळ्यालाच गती मिळाली आहे. घोड्यावरून धाव घेण्यासाठी सज्ज झालेले छत्रपती, असे चित्र पुतळा पाहताक्षणीच डोळ्यांसमोर उभे राहतात. भरदार छातीचे, देखण्या मुद्रेचे छत्रपती. छत्रपतींची मूर्ती तर फारच सुरेख आहे. करमरकरांनी फार अभ्यासपूर्वक हे शिल्प तयार केले असल्याचे जाणवते. पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या दोन्ही बाजूंना बसवलेली म्यूरल्सही देखणी आहेत.

मुंबईहून पुतळा पुण्यात आणताना त्याची उंची व बोगदे लक्षात घेऊन खास वॅगन तयार करण्यात आली. पुण्यात पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. १६ जून १९२८ ला पुतळ्याचे अनावरण झाले. मुंबई गव्हर्नर लेस्ली विल्सन यावेळी उपस्थित होता. छत्रपती राजाराम महाराज व सरदार घराण्यातील वंशज कार्यक्रमाला हजर होते. हत्ती, घोडे अशा बहार उडवून दिली होती. जी सत्ता महाराजांना राष्ट्रपुरुष मानायला तयार नव्हती, त्याच सत्तेच्या वरिष्ठ प्रतिनिधीला म्हणजे विल्सनला महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक व्हावे लागले.

Web Title: Not only the god of Maharashtra but also of India The first equestrian statue of Lord Shiva in British India in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.