पक्षाला नव्हे, माणसाला मत द्या! -नाना पाटेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 02:57 AM2018-04-06T02:57:21+5:302018-04-06T03:14:14+5:30
प्रत्येकाच्या मनात विशिष्ट अशी पंचवीस लोक असतात. त्यांना ठोकायला किंवा तुडवायला पाहिजे, असे दुर्बल माणसाला वाटत असते. मग एखादी दंगल झाली, की आत तुंबलेला राग हातात दगड घेतल्यानंतर तुटलेली काच आणि आवाजातून त्याच्या नपुंसकत्वावर पांघरूण घालतो.
पुणे - प्रत्येकाच्या मनात विशिष्ट अशी पंचवीस लोक असतात. त्यांना ठोकायला किंवा तुडवायला पाहिजे, असे दुर्बल माणसाला वाटत असते. मग एखादी दंगल झाली, की आत तुंबलेला राग हातात दगड घेतल्यानंतर तुटलेली काच आणि आवाजातून त्याच्या नपुंसकत्वावर पांघरूण घालतो. ही यादी प्रत्येकाच्या अंतर्मनात आहे. पण कोणाला बोलता येत नाही. त्यासाठी दगड लागतोच असे नाही, अशा शब्दांत सामान्यांच्या मनात राजकारण्यांविषयी दडलेल्या उद्वेगावर परखडपणे भाष्य करीत ‘आपला मानूस’ ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी ‘पक्षाला नव्हे, माणसांना निवडून द्या’ असा कानमंत्र मतदारराजाला दिला.
तब्बल ३५ वर्षांच्या प्रशासकीय सेवेनंतर विभागीय महसूल आयुक्त चंद्रकांत दळवी नुकतेच निवृत्त झाले. त्यानिमित्त चंद्रकांत दळवी मित्र परिवाराच्या वतीने त्यांच्या कृतज्ञता गौरव सोहळ्याचे बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नाना पाटेकर यांच्या हस्ते दळवी यांचा फुले पगडी आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, तसेच दळवी यांच्या पत्नी पद्मा दळवी, भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक शेखर गायकवाड, भारत विकास ग्रुपचे हनुमंत गायकवाड, ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, माजी सनदी अधिकारी दिलीप बंड, रामदास माने, आनंद कोठडिया, विलास शिंदे, ज्योती लाटकर, सुनील पवार, सचिन ईटकर आदी उपस्थित होते.
काही मंडळींबद्दल निवृत्त झाल्यावर खूप चांगलेच बोलावे लागते. आत आवंढे गिळत तोंडातून स्तुतिसुमने उधळावी लागतात. असे खूप कार्यक्रम मला करावे लागले आहेत. त्यानंतर जाऊन मी अंघोळपण केली, अशी स्पष्ट कबुली देत नाना पाटेकर म्हणाले, ‘‘चंद्रकांत दळवी यांना कोणी कधी जात किंवा धर्म विचारला नाही, त्यांनी जे काम केले ते मनापासून केले. दुर्दैवाने आपल्याकडे जातीचे जास्तच चालले आहे. मला आठवत नाही, की मला कधी कोणी जात विचारली असेल. कारण कलावंत हीच माझी जात आहे. भूमिकेनुसार कधी मी वैश्य किंवा क्षत्रिय असतो. गावागावांत जाऊन लोकांची दु:ख जोपर्यंत समजून घेता येत नाहीत तोपर्यंत ती चित्रपटामधून दाखवता येत नाहीत. अन्यथा माझी चार भिंतीमधलीच दु:ख असली असती आणि तीच तीच तुम्हाला दाखवत राहिलो असतो, मग तुम्हाला त्याचा कंटाळा आला असता. जोपर्यंत सुख आणि दु:खाची व्याख्या बदलत नाही तोपर्यंत मला असे वाटत नाही की मला कलावंत म्हणवून घेण्याचा अधिकार आहे. शहरातला असताना माझी दु:ख आणि शेतकऱ्यांना भेटल्यानंतर दु:खाची परिभाषा पूर्णपणे बदलत गेली. चंद्रकांत दळवी यांनी शेतक-यांची दु:ख जाणली, त्यांच्यासाठी काम केले. आडमुठ्या माणसांना सरळ केले. आपल्याभोवती माणसे निर्माण केली. शासकीय सेवेत राहून नि:स्पृहपणे अशा पद्धतीने काम करणे अत्यंत जिकिरीचे आहे. अनेकांनी आमिषे दाखवली, पण स्वत:च्या वाटणीचे दु:ख घेत दुसºयांना सावली देण्याचे काम दळवी यांनी केले. थकलेली माणसे निवृत्त होतात; पण आता खºया अर्थाने काम सुरू झाले आहे.
सगळ्यांशी सातत्याने शांतपणे बोलत राहणे हे काम दळवी यांनी कसे केले असेल माहिती नाही. मला तर भांडल्याशिवाय झोपच येत नाही. कुणाची गचांडी धर, मानगुट धर, या स्वभावावरती मी ५० वर्षे कसे चित्रपट क्षेत्रात टिकलो मलाच माहिती नाही, अशी मिस्किल टिप्पणी करीत नाना पुढे म्हणाले, ‘‘खरे तर हा चंद्रकांत दळवी यांचा सन्मान नाही. आम्हीच कृतज्ञता व्यक्त करायला हवी. तुमचा सन्मान करण्याची आमची ताकत नाही. तुमचे काम खूप मोठे आहे. तुम्ही आता निवृत्त झाल्यानंतर जे काम कराल त्यामध्ये आम्ही तुमच्याबरोबर असू. तुम्ही सांगाल ते काम करायला आम्ही तयार आहोत.’’ सूत्रसंचालन तहसीलदार सुनील जोशी यांनी केले.
डॉ.नितीन करमळकर म्हणाले, ‘निढळ’ गावामध्ये दगडाला पाझर फोडण्याचे काम चंद्रकांत दळवी यांनी केले. विद्यापीठाची घडी सुरळित करण्यासाठी अशाच माणसांची गरज आहे. विद्याथर््यांना प्रेरित करणे हे मोठे जिकरीचे काम असते. विद्यापीठाच्या चांगल्या योजना आहेत पण त्यासाठी कुणी रोल मॉडेल नाही. त्यामुळे चंद्रकांत दळवी यांनी विद्यापीठात विद्याथर््यांना मार्गदर्शन करण्यासाठी यावे अशी गळ घातली.
हा खूपच भारावून टाकणारा क्षण आहे अशी भावना व्यक्त करून चंद्रकांत दळवी म्हणाले प्रशासकीय सेवेत असताना हगणदारी मुक्त गाव, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान किंवा झिरो पेंडन्सी यांसारख्या काही योजना कार्यान्वित केल्या त्या योजनांचे नियोजन केले होते. पण त्याला यश मिळत गेले. एक दिवस सरकारमधील हगणदारीही बंद होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.