शिवनेरी हापूससाठी पेटंट नाही तर भौगोलिक मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:13 AM2021-02-16T04:13:28+5:302021-02-16T04:13:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शिवनेरी हापूससाठी पेटंट नाही तर भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. यासाठी बराच मोठा ...

Not a patent for Shivneri hapus but a geographical designation | शिवनेरी हापूससाठी पेटंट नाही तर भौगोलिक मानांकन

शिवनेरी हापूससाठी पेटंट नाही तर भौगोलिक मानांकन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शिवनेरी हापूससाठी पेटंट नाही तर भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. यासाठी बराच मोठा ऐतिहासिक तसेच प्रामुख्याने शास्त्रीय पुरावा लागतो व तो अभ्यासाच्या स्तरावर टिकावाही लागतो, त्यामुळे हे मानांकन मिळण्याचा प्रवास बराच मोठा आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या एका विभागाकडून ही मान्यता देण्यात येते. रत्नागिरी हापूससाठी असे मानांकन मिळवण्यासाठी १० पेक्षा जास्त वर्षे लागली अशी माहिती या मानांकनासाठी प्रयत्न करणारे या क्षेत्रातील तज्ज्ञ गणेश हिंगमीरे यांनी सांगितले. रत्नागिरीचे प्रयत्न सुरू होते, त्याला सिंधुदुर्ग व नंतर रायगड, पालघर व ठाण्यातूनसुद्धा आव्हान दिले. आता संपूर्ण कोकणासाठी म्हणून असे मानांकन मिळाले आहे. मात्र, त्यालाही कोल्हापूरमधून आव्हान मिळाले आहे, अशी माहिती हिंगमीरे यांनी दिली.

शिवनेरी हापूस असा काही प्रयत्न सुरू असले तर ते चांगलेच आहे, मात्र त्यासाठी फार काही करावे लागेल, असे स्पष्ट करून हिंगमीरे म्हणाले, असे मानांकन मिळण्यासाठी ऐतिहासिक व शास्त्रीय अशा दोन स्तरावर प्रयत्न करावे लागतात. रत्नागिरी हापूससाठी २०० वर्षांपूर्वीचा तत्कालीन गॅझेटमधील पुरावा सापडला. त्यानंतरच्या त्याच्या प्रवासाचे टप्पे पुराव्यानिशी उलगडता आले. असेच काहीसे शिवनेरी हापूससाठीही करावे लागले. त्यादृष्टिने प्रयत्न होण्याची गरज आहे.

--

नैसर्गिकरीत्या उत्पन्न होणा-या कोणत्याही गोष्टीसाठी पेटंट मिळत नाही. भौगौलिक मानांकन असेल तर त्यासाठीचे निकष पूर्ण करावेच लागतील. शिवनेरी हापूस अशा ब्रँडसाठी प्रयत्न होत असतील तर ते चांगलेच आहे. मात्र, ते शास्त्रीय पद्धतीने, सर्व निकषांचा अभ्यास करून व्हायला हवेत.

- आदित्य अभ्यंकर, अभ्यासक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

--

आम्ही सर्व स्तरावर प्रयत्न करत आहोत. त्यासाठीचे सर्व निकष पूर्ण करण्याची आमची तयारी आहे. अशा महत्त्वाच्या गोष्टींसाठी वेळ लागतोच. त्यामुळेच आम्ही या क्षेत्रातील तज्ज्ञांबरोबर संपर्क साधत आहोत.

- ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा कृषी अधिकारी

Web Title: Not a patent for Shivneri hapus but a geographical designation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.