अध्यक्षांच्या नाट्याचे नाही सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:41 AM2019-01-18T00:41:47+5:302019-01-18T00:41:56+5:30
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन : प्रेमानंद गज्वी यांच्या कलाकृती रंगभूमीपासून दूरच
पुणे : कोणताही नाटककार लेखनाच्या माध्यमातून अभिव्यक्त होत असतो आणि त्याचे प्रतिबिंब हे नाटकामध्ये उमटत असते. यंदा नागपूरमध्ये होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट््य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘घोटभर पाणी’, ‘किरवंत’, ‘गांधी आणि आंबेडकर’ यांसारख्या अनेक दमदार कलाकृतींचे लेखक डॉ. प्रेमानंद गज्वी यांची निवड झाली आहे. समाजातील उपेक्षित घटकांच्या जीवनाचे विदारक वास्तव मांडताना सामाजिक मूल्यभान जपत लेखन करणाºया या नाटककाराच्या अनेक कलाकृती साहित्यासह कलाविश्वात मैलाचा दगड ठरल्या आहेत. त्यांच्या प्रसिद्ध नाटकांचे प्रयोग हिंदी आणि बंगाली भाषेमध्ये सुरू असले तरी मराठी रंगमंचापासून त्यांची नाटके कोसो दूरच आहेत. संमेलनाध्यक्ष म्हणून त्यांची एखादी तरी कलाकृती नाट्य संमेलनाच्या मंचावर सादर व्हावी अशी रसिकांची अपेक्षा आहे. मात्र संमेलनामध्ये आयोजकांकडून गज्वी यांचे भाषण व मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असल्यामुळे रसिकमंडळी संमेलनाध्यक्षाच्या कलाकृतीला मुकण्याची शक्यता आहे.
दरवर्षी नाट्य संमेलनात संमेलनाध्यक्षांच्या भाषणाबरोबरच त्यांची एखादी कलाकृती सादर केली जात होती. माजी संमेलनाध्यक्ष फय्याज, श्रीकांत मोघे, जयंत सावरकर यांनी भूमिका केलेली नाटके संमेलनात रसिकांनी अनुभवली आहेत. अध्यक्षांच्या नाटकांचे सादरीकरण होणे हे बंधनकारक नसले तरी एकप्रकारे त्यांचा हा सन्मानच असतो. आपले अवघे आयुष्य त्यांनी रंगभूमीसाठी समर्पित केले असल्यामुळे त्यांच्यासाठी तो एक आनंद सोहळाच ठरतो. मात्र मुलुंड येथे झालेल्या ९८व्या अ. भा. मराठी नाट्य संमेलनामध्ये संगीत रंगभूमीसाठी आयुष्य वेचलेल्या कीर्ती शिलेदार यांची संमेलनाध्यक्ष म्हणून भाषण व मुलाखत आयोजित केली होती. संगीत नाटक सादर व्हावे, अशी कीर्तीतार्इंचीदेखील इच्छा होती; मात्र तसे झाले नाही. मुलाखतीदरम्यान नाटकांचे काही तुकडे सादर झाले. यंदाही तोच कित्ता गिरवण्याची शक्यता आहे. नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. प्रेमानंद गज्वी यांचीदेखील संमेलनात आपली एखादी कलाकृती सादर व्हावी अशी इच्छा आहे. मात्र आयोजकांकडून अखिल भारतीय मराठी नाट््य परिषदेच्या अध्यक्षांचे भाषण व मुलाखतीचेच आयोजन केले असल्याचे सांगण्यात आले असल्याची माहिती नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. प्रेमानंद गज्वी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
स्वागताध्यक्षपदी नितीन गडकरी
९९वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जन्मभूमी असलेल्या नागपूर नगरीत होत आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी नितीन गडकरी असणार आहेत, अशी माहिती अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी दिली.