लेखनासाठी परखडपणा नव्हे; विचारांमध्ये प्रामाणिकता, सत्यता आणि अभ्यास हवा : प्रा. शेषराव मोरे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 07:01 AM2020-07-26T07:01:00+5:302020-07-26T07:05:01+5:30

ज्या लोकांना लेखन पटत नाही त्यांच्याकडून मग डावा आणि उजवा असे शिक्के मारले जातात.

Not rigor for writing; Thoughts need honesty, truthfulness and study: Prof. Sheshrao More | लेखनासाठी परखडपणा नव्हे; विचारांमध्ये प्रामाणिकता, सत्यता आणि अभ्यास हवा : प्रा. शेषराव मोरे

लेखनासाठी परखडपणा नव्हे; विचारांमध्ये प्रामाणिकता, सत्यता आणि अभ्यास हवा : प्रा. शेषराव मोरे

Next
ठळक मुद्देशेषराव मोरे यांना श्री.ग. माजगावकर पुरस्कार प्रदान

महाराष्ट्रातील वैचारिक लेखनाचा प्रवाह समृद्ध करणारे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. शेषराव मोरे यांना यंदाचा श्री.ग माजगावकर पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार दि.१ ऑगस्टला त्यांना प्रदान केला जाणार आहे. त्यानिमित्त प्रा. मोरे यांच्याशी संवाद साधला असता, स्वतःच्या विचारांमध्ये प्रामाणिकता आणि लेखनात पुरावाधिष्ठित सत्यता असायला हवी. लेखनामागील हेतू शुद्ध असावा. विषयाचा अभ्यास हवा. सगळ्या बाजू समजून घ्यायला हव्यात. अशा स्वरूपाचे लेखन केल्यास लोकांना ते नक्कीच पटते. ज्यांना लेखन पटत नाही त्या व्यक्तींकडून मग उजवा आणि डावा असे शिक्के मारले जातात अशा परखड विचारांमधून त्यांनी लेखनामागील मर्म उलगडले.

....... 

नम्रता फडणीस

 * 'माणूसकार' श्री.ग माजगावकर पुरस्कारामागची भावना काय? 

-श्री.ग माजगावकर हे मोठे विचारवन्त होते. महाराष्ट्रात वैचारिक प्रबोधनाची परंपरा त्यांनी सुरू केली. सामाजिक कार्यातही त्यांचे अमूल्य योगदान होते. त्यांच्या नावाचा पुरस्कार जाहीर होणे याचा नक्कीच आनन्द होत आहे. 

* ' मुस्लिम मनाचा शोध', ' १८५७ चा जिहाद’,’ इस्लाम’ मेकर आॅफ अ मुस्लिम माईंड, ’ ’काश्मीर एक शापित नंदनवन’,’गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी’ यांसारख्या पुस्तकांमधून तुमचे परखड विचार आणि वस्तुनिष्ठ मांडणी दिसते. समाजात या लेखनाचे पडसाद उमटण्याची कधी चिंता वाटली नाही का?

 - सत्याचा शोध घेत राहणे हेच तर लेखकाचे काम आहे. मी आजवर जी पुस्तके लिहिली उदा :मुस्लिम मनाचा शोध' याची मांडणी वास्तवावर आधारित होती. आम्हाला विचार पटले याची पावती देखील मुस्लिम धर्मियांकडून मिळाली.आपल्या लेखनाबाबतचा युक्तीवाद करताना सखोल अभ्यास असला पाहिजे. संदर्भासहित गोष्टी सांगता आल्या पाहिजेत. मग लोक विरोध करीत नाहीत. हा आजवरचा माझा अनुभव आहे.

 * सध्या महात्मा गांधी, नेहरू किंवा मग सावरकर असोत या महापुरुषांवर सातत्याने टीका केली जाते. त्याविषयी तुमचं मत काय? 

- याच कारण म्हणजे कुणीही विषयाच्या खोलात जाऊन डोकावत नाही. वरवरच्या माहितीच्या आधारावर या महापुरुषांवर टीका केली जाते. माझं तर म्हणणं आहे की सावरकर कुणालाच कळले नाहीत. आम्ही जे सावरकर अभ्यासले.ते त्यांच्या कुणा अनुयायांकडून नव्हे तर साहित्यातून ते अभ्यासले. त्यातून त्यांचा बुद्धीवाद आणि विज्ञाननिष्ठा आम्हाला कळली. सर्व धर्मग्रंथ हे आज कालबाह्य झाले आहेत. त्यांना कपाटात बंद करून ठेवावे. आपल्यासाठी काय चांगलं काय वाईट हे आपण ठरवायचं आहे. हा टोकाचा बुद्धीवाद सावरकरांनी मांडला. तसा बुद्धीवाद कुणीच मांडला नाही. त्या विचारांचा प्रभाव आमच्यावर पडला.

 * सावरकरांच्या ' हिंदुत्वा'बद्दल समाजात उलटसुलट चर्चा होताना दिसते.त्यांचा हिंदुत्त्ववाद काय सांगतो?

 - हिंदुत्त्ववाद म्हणजे धर्मवाद नव्हे. त्यावेळी हिंदू मुस्लिम प्रश्न गंभीर होता. फाळणीच्या वेळी मुस्लिम लीगची मागणी सत्तेत 50 टक्के वाटा मिळण्याची होती. सावरकरांनी आक्षेप घेतला.मुस्लिमांची संख्या 24 टक्के आहे तर त्यांना तेवढाच वाटा द्या. असे म्हणून ते हिंदूंच्या बाजूने उभे राहिले. हिंदुत्व म्हणजे हिंदूचे न्याय हक्क राखण. ते बहुसंख्यांक म्हणून त्यांच्यावर अन्याय करू नका असं सावरकरांचे म्हणणे होते.

 * सावरकरांच्या अखंड भारताचे स्वप्न फाळणीमुळे खंडित झाले असा आरोप काँग्रेसवर केला जातो त्यामागचे सत्य काय?

 -मुळात अखंड भारत म्हणजे काय? हे समजून घेतलं पाहिजे. पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत एकत्र झाला असता तर राज्यघटना कशी असती हा प्रश्न उपस्थित झाला. अखंड भारत म्हणजे भूमी एक करणं नव्हे. भारत अखंड राहिला असता तर देशात हिंदू आणि मुस्लिम अशी दोन सत्ता सरकारे स्थापन झाली असती. ते होऊ न देण्यासाठी फाळणी करणं हाच उत्तम पर्याय होता. पंजाब बंगाल ची फाळणी करून काँग्रेसने हिंदू भाग आत घेतला आणि भारत एकसंध केला. अन्यथा 560 संस्थान आपली राहिली नसती. अखंड भारत राहणं हे घातक ठरलं असतं. बॅरिस्टर जिना ला फाळणी नकोच होती. भारत अखंड राहिला असता तर 40 कोटी हिंदूचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असते.

 * काश्मीर मधील 370 कलम रद्द करण्यात आले . तुम्ही त्या घटनेकडे कसे बघता? 

- काश्मीरचा प्रश्न कधीही मिटणार नाही. हे कलम रद्द करून उपयोग होणार नाही. तिथल्या लोकांना भारतात राहायचे नाही. त्यांना ठरवू देत कुठे राहायचे आहे. पण आपण त्यांना ठरवू देत नाही. हे मी 1995 मध्येच ' काश्मीरचे शापित नंदनवन' या पुस्तकात मांडले आहे. हे चित्र अजूनही वेगळं नाही. - .........

Web Title: Not rigor for writing; Thoughts need honesty, truthfulness and study: Prof. Sheshrao More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.