हिंजवडी आयटी पार्क 'ऐटीत'; कोणतीही कंपनी स्थलांतराच्या तयारीत नसल्याचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 12:36 PM2018-09-01T12:36:07+5:302018-09-01T12:38:10+5:30
सध्या असलेल्या आय टी कंपन्यांपैकी कोणतीही स्थलांतर करत नसल्याचे सांगण्यात आले आहे.
पुणे : वारंवार होणारी वाहतूक कोंडी, पराभूत सुविधांचा अभाव म्हणून हिंजवडी आय टी पार्कमधून एक-दोन नव्हे तर तब्बल ५६ कंपन्या स्थलांतरित होत असल्याच्या बातमीचा स्पष्ट इन्कार हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशन संस्थेने केला आहे. सध्या असलेल्या आय टी कंपन्यांपैकी कोणतीही स्थलांतर करत नसल्याचे सांगण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी की, राज्यातील सर्वात मोठे आय टी पार्क असलेल्या 56 कंपन्यांनी हिंजवडी आयटी पार्कमधून काढता पाय घेत असल्याची चर्चा आय टी परिसरात होती. यामध्ये 6 बहुराष्ट्रीय आणि 50 लहान कंपन्यांचा समावेश असल्याचेही सांगण्यात आले होते. गेल्या दोन वर्षांमध्ये दोन मोठ्या कंपन्यांनी वाहतूक कोंडीला वैतागून बालेवाडी आणि खराडी परिसरात आपला मुक्काम हलवला आहे. यानंतर ५६ कंपन्या हिंजवडीला रामराम करणार असल्याच्या बातमीमुळे त्यामुळे आय टी क्षेत्रात गोंधळाचे वातावरण बघायला मिळत होते.
याबाबत लोकमतने हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष अनिल पटवर्धन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे वृत्त नाकारले आहे. ते म्हणाले की,आमच्याकडे सुमारे ८८ हुन अधिक कंपन्या सभासद आहेत अनेक कंपन्यांचे येथे प्रोजेक्ट सूरु आहेत आमच्या तरी ऐकिवात असे काहीही नाही आणि तसे काही झालेही नाही मात्र आयटी कंपन्या व्यतीरिक्त एखादी फर्मास्युटिकल आणि इंजिनेअरिंग कंपनी स्थलांतरीत होत असेल तर सांगता येत नाही मात्र आमच्या आयटी कंपन्यापैकी तरी कोणी स्थलांतरित होण्याच्या मानसिकतेत नाही.