उजनीतून पाण्याचा एकही थेंब सोलापूरला जाणार नाही, नदीत सोडलेले पाणीही बंद पाडणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 01:23 PM2021-05-21T13:23:47+5:302021-05-21T13:25:06+5:30
इंदापुर शेतकरी कृती समितीचा इशारा
कळस: उजनी धरणातून इंदापूरला दिलेल्या पाच टीएमसी पाण्याला सोलापुरच्या लोकप्रतिनिंधीनी विरोध केल्याने सोलापूरलाही ऑक्टोबरनंतर धरणातून पाण्याची तरतूद नसल्याने एकही थेंब जाऊ दिला जाणार नाही. सध्या नदीतून देण्यात आलेले पाणीही बंद पाडण्यात येईल. असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील यांनी दिला आहे. इंदापूरात कळस येथे चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी पाटील म्हणाले, उजनीतून इंदापूरच्या अवर्षणग्रस्त भागाला देण्यात येणारे पाणी हे आमच्या हक्काचे पाणी आहे. त्यास सोलापूरमधून होणारा विरोध हे राजकीय द्वेषापोटी रचलेले षडयंत्र आहे. उजनी धरणामुळे तालुक्यातील विस्थापित झालेल्या लोकांना पाणी मिळत नसल्याची वस्तूस्थिती आहे. मात्र सोलापूरला आँक्टोबरनंतर अनाधिकृतपणे पाणी दिले जाते, ही बाब नियमबाह्य आहे. सध्या सोलापूरला नदीतून देण्यात येणारे पाणीही बंद पाडण्यात येणार आहे. सोलापूरकरांनी आमची खोडी काढली आहे. त्यामुळे आम्ही गप्प बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
खडकवासला धरणसाखळीतील पाणी पुण्याच्या वाढत्या पाणी मागणीमुळे आम्हाला पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. परंतू त्यांनी वापरलेल्या पाण्यापैकी सुमारे ८० टक्के सांडपाणी हे भिमा नदीत येत आहे. हेच सांडपाणी आम्ही शेतीसिंचनासाठी मागणी करत आहोत. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पाठपुरावा करुन शेटफळगढे उपसा सिंचन योजनेस मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. मात्र जलसंपदा मंत्र्यांनी हीच सिंचन योजना रद्द करत असल्याचे जाहीर केले. हा प्रकार म्हणजे ताटात वाढलेला घास परत घेण्यासारखा आहे. अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
तालुक्यातील ६० हजार एकर क्षेत्राला याचा फटका बसणार आहे. उजनीतून इंदापूरकरांना पाणी देण्यास विरोध करणारे सोलापूरातील लोकप्रतिनीधी उजनीतून बोगस पाणी पळवित असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे सोलापूरकरांना नदीतून देण्यात येणारे पाणी बंद पाडण्यात येणार आहे याशिवाय आम्ही न्यायालयात आमच्या हक्क्याच्या पाण्यासाठी लढा देणार असल्याचे ते म्हणाले आहेत.