‘काही न बोलणे' हेच तुमचे मराठीसाठी योगदान असेल; डाॅ. सदानंद मोरेंचे राजकारण्यांना खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 03:08 PM2024-10-20T15:08:20+5:302024-10-20T15:08:50+5:30

खालच्या पातळीवरची टीका करून राजकीय नेते मराठी भाषेच्या दर्जाची अधोगती करत आहेत

Not speaking will be your contribution to Marathi Dr Sadanand More harsh words to politicians | ‘काही न बोलणे' हेच तुमचे मराठीसाठी योगदान असेल; डाॅ. सदानंद मोरेंचे राजकारण्यांना खडेबोल

‘काही न बोलणे' हेच तुमचे मराठीसाठी योगदान असेल; डाॅ. सदानंद मोरेंचे राजकारण्यांना खडेबोल

पुणे : ‘आपल्या भाषेचा दर्जा राखणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. मात्र, खालच्या पातळीवरची टीका करून राजकीय नेते भाषेच्या दर्जाची अधोगती करीत आहेत. त्यामुळे ‘काही न बोलणे हेच तुमचे मराठीसाठी योगदान असेल,’ असे आता आपल्याला राजकारण्यांना सांगावे लागेल, अशा शब्दांत राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डाॅ. सदानंद मोरे यांनी शनिवारी राजकारण्यांना खडे बोल सुनावले.'

डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनतर्फे आयोजित ‘अभिजात भाषा जनसन्मान सोहळा’ कार्यक्रमात डॉ. सदानंद मोरे बोलत होते. वात्रटिकाकार रामदास फुटाणे, विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, अभिजात भाषा पाठपुरावा समितीचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे, सरहद संस्थेचे संजय नहार आणि प्रा. दिलीप पंगू यावेळी उपस्थित होते. मराठी भाषा आणि साहित्याचे जागतिक स्तरावर काय स्थान आहे, हेही पाहणे गरजेचे आहे, याकडे मोरे यांनी लक्ष वेधले. सध्याच्या कृत्रिम भाषेबद्दलही मराठी माणसाने सजग राहिले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मुळे म्हणाले, ‘इतर राज्यांमध्ये मराठी भाषिक आणि संस्था आहेत; परंतु त्याकडे महाराष्ट्राचे लक्ष कधीच गेले नाही. निर्मिती क्षमता वाढली तरच मराठीचा विकास होईल. डॉ. दीक्षित म्हणाले, ‘मराठीला अभिजित दर्जा मिळण्यात अनेक संस्थांनी योगदान दिले. निवडणुका असो किंवा इतर काही कारण असो अभिजात दर्जा मिळाला हे महत्त्वाचे आहे. आता शासनाकडून अपेक्षा ठेवू नका. तर आपली भाषा जपणे ही समाज म्हणून आपलीही जबाबदारी आहे. आपण मराठीसाठी काय करतो याचाही विचार झाला पाहिजे.’ डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांची पुस्तकतुला करण्यात आली. धनश्री पाटील यांनी प्रास्ताविक, तर वंदना कोर्टीकर यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Not speaking will be your contribution to Marathi Dr Sadanand More harsh words to politicians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.