आयुक्तालयासाठी लक्षवेधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 03:05 AM2017-07-24T03:05:05+5:302017-07-24T03:05:05+5:30

पिंपरी-चिंचवडमधील वाहतुकीचा प्रश्न, वायसीएममध्ये वैद्यकीय कार्यालय सुरू करणे, स्वतंत्र पोलीस आयुक्तालय, तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी

Notable eyeballs | आयुक्तालयासाठी लक्षवेधी

आयुक्तालयासाठी लक्षवेधी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील वाहतुकीचा प्रश्न, वायसीएममध्ये वैद्यकीय कार्यालय सुरू करणे, स्वतंत्र पोलीस आयुक्तालय, तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी प्रमुख कार्यालये शहरात आणणे या विषयावर राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे चिंचवड, भोसरी आणि पिंपरीतील आमदारांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड परिसरातील लोकप्रतिनिधींनी विविध विषय मांडण्याची तयारी केली आहे. त्यात रस्त्यांचे रुंदीकरण रखडल्याने निर्माण झालेला वाहतुकीचा प्रश्न, पिंपरीतील वायसीएममध्ये वैद्यकीय कार्यालय सुरू करणे, शहराचे नागरीकरण वाढत असताना शहर सुरक्षेच्या दृष्टीने स्वतंत्र पोलीस आयुक्तालय, पिंपरी-चिंचवडमधील अनेक नागरिकांना कामासाठी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात जावे लागते. त्यामुळे वेळ आणि पैशांचा अपव्यय होतो. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी प्रमुख कार्यालये शहरात आणणे, शहर परिसरामध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या इमारती मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र, या इमारती आणि खेळाच्या मैदानांची दुरवस्था झाली आहे. कामगार कल्याण मंडळात सुमारे ३ हजार कामगारांची नोंदणी झाली असून, विविध गैरसोयींमुळे कामगारांना विविध योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच पुणे विद्यापीठ परिसरात मारामारीच्या अनेक घटना घडत असून, सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. मोशी आणि पुनावळे येथील कचरा डेपोची जागा अपुरी पडत आहे. कचरा नियोजनासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे, आदी प्रश्नांबाबत आवाज उठविणार असल्याचे आमदारांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडकरांना दिलेल्या आश्वासनानुसार अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू करणे, वाहतुकीचा प्रश्न सोडविणे, तसेच पिंपरीत महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आहे. तिथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे या विषयावर आवाज उठविणार आहे. तसेच पुण्यातील जिल्हास्तरीय कार्यालये पिंपरी-चिंचवडमध्ये कशी आणता येतील यासाठी प्रयत्न करणार आहे.
- लक्ष्मण जगताप, आमदार, शहराध्यक्ष, भाजपा

शहराची लोकसंख्या २० लाखावर गेली आहे. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने स्वतंत्र पोलीस आयुक्तालय ही काळाची गरज झाली आहे. त्यामुळे स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्माण करण्याची गरज आहे. तसेच पुणे विद्यापीठ परिसरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे. कामगार कल्याण मंडळाच्या इमारतींची दुरवस्था आहे. तसेच विविध योजनांचा लाभ शहरवासीयांना करून देण्याची गरज आहे. तसेच पवना, मुळा, इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा लक्षवेधी मांडणार आहे.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी

स्वतंत्र पोलीस आयुक्तालय व्हावे तसेच पवना, इंद्रायणी नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करावी, याबाबत लक्षवेधी मांडणार आहे. त्याचबरोबर एमआयडीसीच्या जागेवर ज्या झोपड्या आहेत. त्या झोपड्यांचे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) योजनेंतर्गत पुनर्वसन करावे. प्राधिकरणाच्या वतीने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करण्यात आल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा द्यावा, याशिवाय पिंपरी-चिंचवड महापालिकेत रिक्त जागांची भरती करावी, आदी मुद्दे उपस्थित करणार आहे.
- गौतम चाबुकस्वार, आमदार, पिंपरी

Web Title: Notable eyeballs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.