नुसतं फेसबुक, इन्स्टावर रिल्स टाकून काही होत नाही; चांगल्या कामाला पुरस्कार मिळतो - सुमित राघवन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 12:52 PM2024-05-06T12:52:35+5:302024-05-06T12:52:50+5:30
चांगलं काम करण्यासाठी घराबाहेर पडावं लागतं आणि त्या चांगल्या कामाची पावती म्हणजे पुरस्कार असतो
पुणे : ‘‘निळू फुले या नावाचे वजन कळतंय. मोठा माणूस. समाजभान, चतुरस्त्र कलाकाराव्यतिरिक्त आपण समाजाला काय देत आहोत, कलाकार केवळ तीन तासांसाठी आहोत, बाकीचे २१ तास महत्त्वाचे आहेत, त्यात आम्ही काय करतो, त्यावरून समाजभान कळतं, अशा भावना अभिनेता सुमित राघवन यांनी व्यक्त केल्या.
निळू फुले यांचे कुटुंबीय व बेलवलकर सांस्कृतिक मंचातर्फे यंदाचा ‘निळू फुले कृतज्ञता सन्मान’ राघवन यांना अभिनेते सचिन खेडेकर यांच्या हस्ते रविवारी (दि. ५) प्रदान करण्यात आला. यावेळी गार्गी फुले, समीर बेलवलकर उपस्थित होते. पुरस्कार सोहळ्याआधी वैभव जोशी आणि गार्गी फुले यांनी पावसाच्या कविता सादर केल्या.
राघवन म्हणाले, ’’आम्ही कलाकार आहोतच, कलेच्या माध्यमातून व्यक्त होत असतो. पण बरेचदा असं होतं की, आपल्याला माणूस म्हणून काय वाटतं. घराबाहेर पाऊल ठेवतो, तेव्हा काय संदेश बाहेर देतो. ते महत्त्वाचे असते. नुसतं फेसबुकवर, इन्स्टावर रिल्स टाकून काहीही होत नाही. चांगलं काम करण्यासाठी घराबाहेर पडावं लागतं आणि त्या चांगल्या कामाची पावती म्हणजे पुरस्कार असतो.’’
खेडेकर म्हणाले, ’’निळूभाऊंच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार म्हणजे केलेल्या कामाची पावती आहे. इतक्या मोठ्या माणसाचा सन्मान तुम्ही आणखी किती पुढे घेऊन जाता, याची जबाबदारी वाढते. आपल्याकडे वय झाल्यावर पुरस्कार देतात. त्याचा काय उपयोग? कारण पुरस्कारापासून प्रेरणा घेऊन पुढे ते काम करू शकतील ना !’’
निळूभाऊ ‘बाई वाड्यावर या’पुरते नाहीत !
‘बाई वाड्यावर या’ केवळ या वाक्यापुरते निळूभाऊ नाहीत. ते खूप समाजभान असलेले व्यक्ती होते. कलाकार होते. परंतु, एकाच भूमिकेमुळे त्यांची प्रतिमा वाईट केली. ते माणूस म्हणून कितीतरी चांगले होते, ते लोकांना समजावेत, यासाठी हा कृतज्ञता सन्मान आम्ही देतोय, अशा भावना गार्गी फुले यांनी व्यक्त केल्या.