जुन्याच याेजनांचा नवीन 'संकल्प' ; भाजपाचा पुण्याचा जाहीरनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 08:28 PM2019-04-17T20:28:19+5:302019-04-17T20:33:37+5:30
भाजपाने प्रकाशित केलेल्या जाहिरनाम्यात बहुतांश याेजना या जुन्याच आहेत. त्याच याेजना नव्याने पूर्णकरण्याचा संकल्पच भाजपाने आपल्या संकल्पपत्रात दिला आहे.
पुणे : भाजपा युतीचा पुण्याचा जाहीरनामा आज पुण्यातील भाजप कार्यालयात प्रकाशित करण्यात आला. त्याला भाजपाने संकल्पपत्र म्हटले आहे. भाजपाने प्रकाशित केलेल्या जाहिरनाम्यात बहुतांश याेजना या जुन्याच आहेत. त्याच याेजना नव्याने पूर्ण करण्याचा संकल्पच भाजपाने आपल्या संकल्पपत्रात दिला आहे. आज पुण्याचे भाजपाचे उमेदवार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष याेगेश गाेगावले, खासदार अनिल शिराेळे, शिवसेनेच्या उपनेत्या निलम गाेऱ्हे, आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, आरपीआयचे शहराध्यक्ष अशाेक कांबळे, महापाैर मुक्ता टिळक, उपमहापाैर सिद्धार्थ धेंडे आदी उपस्थित हाेते.
भाजपाचा जाहीरनाम्यात विविध आश्वासने दिली आहेत. मेट्राेपासून पाणीपुरवठा, स्मार्ट सिटी, नदी सुधारणा, घनकचरा व्यवस्थापन, आराेग्य, शिक्षण, क्रीडा, संस्कृती यावर या जाहीरनाम्यात भर देण्यात आला आहे. त्याचबराेबर पुण्याला याेग सिटी करण्याचे आश्वासन सुद्धा भाजपाकडून देण्यात आले आहे. शहरासाठी सांस्कृतिक धाेरण देखील तयार करणार असल्याचे भाजपाकडून जाहीरनाम्यात सांगण्यात आले आहे. पुण्याला स्मार्ट सिटी करण्याचा निर्धार पुन्हा एकदा जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. पुणेकरांना 24 तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देखील देण्यात आले आहे.
पाण्याच्या मुद्यावर बाेलताना बापट म्हणाले, पाणी काहीवेळ येत असल्याने नागरिक पाण्याची साठवणूक करत असतात. परंतु 24 तास पाणी पुरवठा सुरु झाल्यास नागरिक साठवणूक करणार नाहीत. तसेच यामुळे पाण्याची बचत हाेणार आहे. तसेच पुण्यात येणाऱ्या लाेकसंख्येचा विचार करता त्यापद्धतीने नियाेजन करण्यात येईल. कसबा येथे मेट्राेच्या प्रस्तावित स्टेशनला स्थानिकांचा विराेध आहे या प्रश्नावर बाेलताना बापट म्हणाले, की कसब्यातला एकही माणूस रस्त्यावर राहणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल. दादाेजी काेंडदेव शाळेची जागा ताब्यात मिळाली असून तिचा वापर स्टेशनसाठी करण्यात येणार आहे. त्याचबराेबर या स्टेशनमुळे जे नागरिक बाधित हाेतील त्यांचे पुनर्वसन केल्याशिवाय मेट्राेचे स्टेशन तयार करण्यात येणार नाही.