‘सह्याद्री हॉस्पिटल’चा नर्सिंग होम परवाना रद्द करण्याची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:10 AM2021-06-02T04:10:41+5:302021-06-02T04:10:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाबाधित रुग्णांकडून वाढीव बिल आकारणी करणाऱ्या व वारंवार सूचना देऊनही बिल कमी न करणाऱ्या ...

Notice of cancellation of nursing home license of Sahyadri Hospital | ‘सह्याद्री हॉस्पिटल’चा नर्सिंग होम परवाना रद्द करण्याची नोटीस

‘सह्याद्री हॉस्पिटल’चा नर्सिंग होम परवाना रद्द करण्याची नोटीस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनाबाधित रुग्णांकडून वाढीव बिल आकारणी करणाऱ्या व वारंवार सूचना देऊनही बिल कमी न करणाऱ्या पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलवर अखेर महापालिकेने कारवाईचा बडगा उचलला आहे. ‘बिल कमी का केले जात नाही, याबाबत दोन दिवसांत खुलासा करावा, अन्यथा हॉस्पिटलचा नर्सिंग होम परवाना सहा महिन्यांकरिता निलंबित करू,’ असा इशारा महापालिकेने दिला आहे़

राज्य शासनाच्या सूचनांप्रमाणे कोरोनाबाधितांकडून उपचार कालावधीतील बिलांची आकारणी न करता, अवाजवी बिले सह्याद्री हॉस्पिटलच्या सर्वच शाखांकडून करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी महापालिकेकडे आल्या. याची दखल घेत महापालिकेने सह्याद्री हॉस्पिटलला बिल कमी करण्याबाबत वारंवार लेखी सूचना केल्या. मात्र यास न जुमानता ‘सह्याद्री’ने मनमानी कारभार चालूच ठेवला. अखेर महापालिकेने सह्याद्री हॉस्पिटल प्रशासनातील ‘बिलिंग’ विभागातील अधिकाऱ्यांना २८ जानेवारीला चर्चेसाठीही बोलविले. यात बिलांमधल्या त्रुटी रुग्णनिहाय दाखवून देण्यात आल्या. परंतु, त्यासही या हॉस्पिटल प्रशासनाने जुमानले नाही. उलट महापालिकेच्या सूचना डावलून कोरोबाधितांकडून वाढीव बिलांची आकारणी कायम ठेवली.

परिणामी मंगळवारी (दि. १) महापालिकेने सह्याद्री हॉस्पिटलला एकूण ३४ बिलांमध्ये जादा आकारणी केलेले १९ लाख ७० हजार १४३ रुपये कमी करण्याबाबतची अखेरची नोटीस दिली आहे. दोन दिवसांत यावर कार्यवाही न केल्यास सह्याद्री हॉस्पिटलचा नर्सिंग होम परवाना रद्द करण्याचा इशारा या नोटिशीत दिला आहे.

चौकट

“शहरातील ज्या खासगी हॉस्पिटलने वाढीव बिले आकारली त्यांना महापालिकेने नोटीस दिल्यावर त्यांनी ती लागलीच कमी केली. मात्र वारंवार सांगून, बिलिंग विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊनही सह्याद्री हॉस्पिटलने अद्याप कोणतीच दाद दिली नाही. अखेर त्यांचा नर्सिंग होम परवाना रद्द करण्याबाबत नोटीस दिली आहे.”

डॉ. आशिष भारती, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका

चौकट

“सह्याद्री हॉस्पिटलच्या पाच शाखांमधील ३४ प्रकरणांत १९ लाख ७० हजार १४३ रुपये जादा बिल आकारणी झाली आहे. यातील १६ बिलांमधील ११ लाख ९९ हजार ९४२ रुपये कमी करण्याबाबत २१ जानेवारीपूूर्वीच हॉस्पिटल प्रशासनाला सांगितले. या २१ तारखेच्या बैठकीनंतर या हॉस्पिटलविरोधात १८ तक्रारी आल्या. यातही ७ लाख ७० हजार २०१ रुपये अधिक बिल आकारले गेले आहे़ ”

डॉ. मनीषा नाईक, सहायक आरोग्यप्रमुख, पुणे महानगरपालिका

Web Title: Notice of cancellation of nursing home license of Sahyadri Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.