दांडीबहाद्दर अधिकाऱ्यांना नोटीस
By admin | Published: April 14, 2015 01:35 AM2015-04-14T01:35:53+5:302015-04-14T01:35:53+5:30
वारंवार सूचना देऊनही विषय समित्यांच्या बैठकांना दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार आहे.
पुणे : वारंवार सूचना देऊनही विषय समित्यांच्या बैठकांना दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार आहे. शहर सुधारणा समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीस काही मोजकेच विभागप्रमुख उपस्थित राहिल्याने संतापलेल्या समिती सदस्यांनी या प्रकाराची तक्रार थेट अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे केली. त्याची गंभीर दखल घेत अनुपस्थित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार असल्याचे बकोरिया यांनी सांगितले.
महापालिकेच्या स्थायी समिती खालोखाल येणाऱ्या चार विषय समित्या आहेत. या समित्यांमध्ये शहरातील विषयांसंदर्भात निर्णय घेतले जात असले, तरी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून या समित्यांकडे कानाडोळा केला जातो. त्यामुळे अनेकदा या समित्या तहकूब करून महापालिका प्रशासनाचा निषेधही करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही अधिकाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्षच केले जात आहे. आज सकाळी शहर सुधारणा समितीची बैठक सुरू झाली असताना, केवळ दोन ते तीन विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तर आपल्या विभागाशी संबधित विषय नसल्याने अनेक अधिकाऱ्यांनी महापालिकेत असूनही दांडी मारली होती. त्यामुळे संतापलेल्या शहर सुधारणा समिती सदस्यांच्या वतीने अध्यक्षा रूपाली पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे या प्रकाराची तक्रार करून या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली.
$$्निअधिकारी बैठकीला उपस्थित राहत नाहीत. याबाबत यापूर्वीही तक्रारी आल्या आहेत. त्या वेळी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून समज दिली होती. मात्र, त्यानंतरही असे प्रकार घडतच असल्याने आज बैठकीस अनुपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांची माहिती घेऊन खुलासा मागविण्यात येणार असल्याचे बकोरिया यांनी स्पष्ट केले. समाधानकारक खुलासा नसलेल्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.