उच्च न्यायालयाची पुणे पोलिसांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 04:31 AM2018-01-19T04:31:25+5:302018-01-19T04:31:36+5:30
५६ मांजरांना बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना गुरुवारी नोटीस बजावली. पोलिसांनी घरात घुसून ५६ मांजरींचा बेकायदेशीररीत्या ताबा
मुंबई : ५६ मांजरांना बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना गुरुवारी नोटीस बजावली.
पोलिसांनी घरात घुसून ५६ मांजरींचा बेकायदेशीररीत्या ताबा घेतल्याचा आरोप पुण्याच्या संगीता कपूर (४२) यांनी याचिकेद्वारे केला आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना तीन आठवड्यांत त्यांची बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत.
पोलिसांनी कारवाईदरम्यान छळवणूक केली. तसेच सोने व अन्य मौल्यवान वस्तू चोरल्याचा आरोपही कपूर यांनी केला आहे. न्या. भूषण गवई व बी. पी. कुलाबावाला यांनी याबाबतही पोलिसांना त्यांची बाजू स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
कपूर यांनी पोलिसांवर कायद्यानुसार कारवाई करण्याची विनंती याचिकेद्वारे केली आहे. तसेच याचिका प्रलंबित असताना पोलीस व प्राणी कल्याण प्रशासनाला सर्व मांजरांचा ताबा परत देण्याची विनंतीही कपूर यांनी न्यायालयाला केली आहे. न्यायालयात दाखल केलेल्या करण्यात आलेल्या या याचिकेनुसार, संगीता यांचे पुण्यात दोन फ्लॅट आहेत. एका फ्लॅटमध्ये संगीता, त्यांची आई व बहीण राहतात. तर दुसºया फ्लॅटमध्ये त्यांनी ५६ मांजरांना ठेवले होते.
ही सर्व मांजरे रस्त्यावरची होती. मात्र संगीता यांनी या सर्व मांजरांची सुटका करून स्वत:च्या घरी आसरा दिला. मात्र त्यांची नीट काळजी घेतली नाही. बंद घरात ही मांजरे राहत होती. त्यामुळे घरात आणि परिसरातही अस्वच्छता वाढली होती.