नदीपात्रातील राडारोडा तात्काळ काढण्याच्या नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:10 AM2021-05-29T04:10:21+5:302021-05-29T04:10:21+5:30
पुणे : दरवर्षी पावसाळ्यात नदीला पूर आल्याने कोट्यवधींच्या मालमत्तेचे नुकसान होते. यासोबतच अनेक रहिवासी भागात पाणी घुसल्याने जीवितहानी होण्याचीही ...
पुणे : दरवर्षी पावसाळ्यात नदीला पूर आल्याने कोट्यवधींच्या मालमत्तेचे नुकसान होते. यासोबतच अनेक रहिवासी भागात पाणी घुसल्याने जीवितहानी होण्याचीही शक्यता असते. नदीचा प्रवाह अनेक ठिकाणी अतिक्रमणे व राडारोडा टाकून कमी करण्यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी ही अतिक्रमणे आणि राडारोडा दूर केला जाणार असून संबंधितांना नोटिसा बजावण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी क्षेत्रीय कार्यालयांना दिल्या आहेत.
महापालिकेच्यावतीने पावसाळापूर्व कामांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकण्यात आलेला आहे. काही ठिकाणी भराव टाकण्यात आल्याचे प्रकारही यापूर्वी उजेडात आलेले आहेत. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी अधिकाऱ्यांसह शुक्रवारी पूर्ण नदीपात्राची पाहणी केली. यावेळी जागोजागी राडारोडा टाकल्याचे निदर्शनास आले. नदी पात्रातील अनेक खासगी भूखंडांवरही राडारोडा टाकण्यात आलेला आहे.
पावसाळ्यात त्यामुळे प्रवाहाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हानी होण्याचीही शक्यता आहे. पाहणी करताना संबंधित क्षेत्रीय कार्यालयांचे क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. या सर्वांना राडारोडा टाकणाऱ्या व्यक्तींना तात्काळ नोटिसा देण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच प्रवाहाला अडथळा होणाऱ्या गोष्टींवर कारवाई केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त खेमनार यांनी सांगितले.
--//--
नदीपात्रात मेट्रोचे खांब उभे करण्याचे कामही सुरू आहे. मेट्रोचाही राडारोडा, बांधकाम साहित्य आणि मातीचा भराव जागोजागी टाकण्यात आलेला आहे. यासंदर्भात पालिकेकडून मेट्रोच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली असून त्यांनाही याबाबत सूचना करण्यात आल्याचे डॉ. खेमनार सांगितले.