पुण्यातील तीन कंपन्यांना कर्मचारी कपात केल्याने वकिलांकडून नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 07:28 PM2020-04-17T19:28:12+5:302020-04-17T19:28:54+5:30
कोणतेही कारण न देता कर्मचारी कपात केल्यामुळे दोन वकिलांनी संबंधीत कंपन्यांना नोटीस कंपन्यांनी आपला निर्णय तातडीने मागे घ्यावा, कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन द्यावे अशी नोटिसद्वारे मागणी
पुणे : टाळाबंदीच्या काळात कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकू नये असे आवाहन देशाचे पंतप्रधानपद नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तरी देखील काही कंपन्या कर्मचारी कपात करत असल्याचे दिसून आले आहे. पुण्यातील अशा तीन कंपन्यांनी कोणतेही कारण न देता कर्मचारी कपात केल्यामुळे दोन वकिलांनी संबंधीत कंपन्यांना नोटीस पाठवली आहे.
अॅड. राजेश इनामदार आणि अॅड. तोसिफ शेख यांनी पुण्यातील तीन कंपन्याना नोटीस पाठवली आहे. या कंपन्यांनी जवळपास शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आहे. तर इतरांसाठी वेतन कपातीचीही घोषणा देखील केली आहे. देशातील सर्व कॉपोर्रेट कंपन्या आणि संस्थांनी या परिस्थितीत आपल्या कर्मचाऱ्यांच्या मागे उभं रहावं. त्यांना मानसिक आणि आर्थिक संकटात सोडू नये, असंही इनामदार आणि शेख यांनी यावेळी सांगितले.
लॉकडाऊनमुळे कर्मचाऱ्यांना घरी राहावे लागत आहे. पण याच काळात त्यांच्यावर बेरोजगारीचं संकटही कोसळतंय. आपत्तीच्या काळात कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत संबंधित कंपन्यांवर कारवाई होऊ शकते. कंपन्यांनी कोणतीही नोटीस न देता कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आहे आणि इतरांच्या वेतनात कपात जाहीर केली आहे. काही कर्मचाऱ्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्यात आलंय. विविध कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना नोटीसवर ठेवलं असून त्यांच्या भविष्याविषयी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं नोटीसीमध्ये नमूद करण्यात आल आहे. या कंपन्यांचा निर्णय हा बेकायदेशीरच नाही, तर असंवेदनशील आणि दंडात्मकही आहे. त्यामुळे या कंपन्यांनी आपला निर्णय तातडीने मागे घ्यावा, कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन द्यावे अशी मागणी नोटिसद्वारे करण्यात आलीआहे.