दहीहंडीत जाहिरात केल्याबाबत नाेटीस; मंडळांचे कार्यकर्ते झाले आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2023 11:04 PM2023-10-05T23:04:16+5:302023-10-05T23:07:54+5:30
दंड भरण्याच्या नोटिसीबाबत सोमवारी बैठक घेऊन निर्णय.
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे :दहीहंडी उत्सवकाळात मंडळांच्या परिसरात जाहिरात लावल्याप्रकरणी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने उद्योजक पुनीत बालन यांना शुल्क भरण्याची नोटीस पाठवली. या विराेधात मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिकेवर निषेध मोर्चा काढत या नोटिसीला स्थगिती देण्याची मागणी केली. त्यावर अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी येत्या सोमवारी बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच तोपर्यंत शुल्क भरण्यास स्थगिती दिली आहे.
गणेश मंडळाचे कार्यकर्ते ऋषिकेश बालगुडे, नितीन पंडित, पुष्कर तुळजापूरकर, राजेंद्र काकडे, संजय देशमुख, श्याम मारणे, अक्षय माने, राजेंद्र देशमुख, विनोद सातव यांच्यासह कार्यकर्ते माेठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले.
होर्डिंगवर कारवाई करताना महापालिका त्या होर्डिंगवर जाहिरात असलेल्या कंपन्यांना दोषी धरत नाही, तर होर्डिंग मालकावर कारवाई होते. मग या घटनेत जाहिरात कंपनीला नोटीस देण्याचा प्रकार माधव जगताप यांनी केला. त्यामुळे कारवाईच्या हेतूबद्दलच शंका निर्माण होते. कोरोनानंतर मंडळांना वर्गणी मिळण्यात अडचणी येत असताना पुनीत बालन यांनी मोठा आर्थिक हातभार लावला. दुसरीकडे मंडळांसाठीचे जाहिरात शुल्क माफ करण्याच्या शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून महापालिका अधिकारी मनमानी काम करत आहेत. त्यामुळे पुनीत बालन यांना दिलेली नोटीस मागे घ्यावी; अन्यथा रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन उभारू, असा इशारा शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी दिला. त्यावर पुनीत बालन यांना दंडाची नोटीस पाठवली नाही, असे डॉ. खेमनार यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारने गणेश मंडळांना उत्सव काळात जाहिरात शुल्क माफ केले आहे. दहीहंडी आणि गणेशाेत्सव काळात लावलेल्या जाहिरातींचे शुल्क आकारले आहे. तो दंड नसून जाहिरात शुल्क आहे. येत्या सोमवारी यासंदर्भात बैठक बोलावून निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत ती रक्कम भरण्यास स्थगिती देत आहोत. - डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त