‘त्या’ भूखंडधारकांना नोटिसा
By admin | Published: April 26, 2016 02:16 AM2016-04-26T02:16:38+5:302016-04-26T02:16:38+5:30
पिंपरी, तळेगाव पुष्पसंवर्धन उद्यान, चाकण औद्योगिक क्षेत्रातील भूखंडांपैकी विहित मुदतीत विकास न केलेल्या १८० पैकी १०३ भूखंडधारकांना कारणे दाखवा नोटीस दिल्या होत्या
पिंपरी : पिंपरी, तळेगाव पुष्पसंवर्धन उद्यान, चाकण औद्योगिक क्षेत्रातील भूखंडांपैकी विहित मुदतीत विकास न केलेल्या १८० पैकी १०३ भूखंडधारकांना कारणे दाखवा नोटीस दिल्या होत्या. त्यातील काही भूखंडांचे बांधकाम पूर्णत्वाचा दाखले मिळाले आहेत, तर काही भूखंडांना उद्योग संजीवनी योजनेंतर्गत एप्रिलअखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तळेगाव पुष्पसंवर्धन उद्यानातील तीन भूखंड एमआयडीसीकडून ताब्यात घेण्यात आले आहेत.
पिंपरी, तळेगाव, चाकण औद्योगिक टप्प्यात सुमारे १८३ हेक्टर क्षेत्र दिलेल्या कालावधीत विकासित करण्यात आले नाही. त्या भूखंडमालकांना एमआयडीसीकडून कारवाई करण्यात आली होती. त्यातील उद्योग संजीवनीअंतर्गत एप्रिलअखेरपर्यंत ७७ भूखंडांना मुदत देण्यात आली आहे. एप्रिलअखेरनंतर बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न देण्यात आलेल्या भूखंडांना नोटीस देण्यात येणार आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. मार्चअखेरपर्यंत ताबा घेण्यात आलेल्या तीन भूखंडांतील सहा हेक्टर क्षेत्राचे वाटप केले आहे. पिंपरी औद्योगिक क्षेत्रांतर्गत दिलेल्या कालावधीत विकास न केलेल्या भूखंडांची संख्या १२८ आहे. त्यात एकूण क्षेत्र १५ हेक्टर आहे. तळेगाव पुष्पसंवर्धन उद्यानांतर्गत दिलेल्या कालावधीत विकसित करण्यात आलेल्या भूखंडांची संख्या कमी असली, तरी एकूण क्षेत्र मात्र अधिक आहे. ते सुमारे २९ हेक्टर असून, यातील सर्व भूखंडमालकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्या होत्या. त्यातील १८ भूखंडमालकांनी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला व आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यात आली आहे. त्यात तीन भूखंडांवर मात्र कारवाई करून ती ताब्यात घेण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)