चित्रा वाघ यांना राज्य महिला आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 11:48 AM2023-01-07T11:48:58+5:302023-01-07T11:49:08+5:30

लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तुम्ही अपयशी ठरलात....

Notice to Chitra Wagh for contempt of State Commission for Women | चित्रा वाघ यांना राज्य महिला आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस

चित्रा वाघ यांना राज्य महिला आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस

Next

धायरी (पुणे) : एका महिलेच्या पेहेरावाबाबत प्रसारमाध्यमांना संबोधित करताना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अप्रतिष्ठा होईल, अशी वक्तव्ये चित्रा वाघ यांनी केली आहेत. त्याचप्रमाणे, यापूर्वीच्या एका प्रकरणात आयोगाने काढलेल्या नोटिसीचे चुकीचे अन्वयार्थ लावून ही नोटीस प्रसार माध्यमांसमोर प्रदर्शित करून आयोगाच्या कामकाजाबाबत समाजात अविश्वास निर्माण होईल, असे वर्तन केले आहे. त्यामुळे त्यांना याबाबत नोटीस देण्यात आली असल्याची माहिती आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उर्फी जावेद हिच्या कपड्यावरून सुरू झालेल्या वादावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद महिला आयोगाला खडे बोल सुनावले होते. चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या कामावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर, आता महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस पाठविली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत, चित्रा वाघ यांना नोटीस पाठविल्याची माहिती दिली आहे. या नोटीसमध्ये महिला आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी दोन दिवसांत खुलासा करण्याचं आव्हान करण्यात आले आहे. १९९३ कलम ९२ (२) (३) नुसार चित्रा वाघ यांना महिला आयोगाने नोटीस पाठविली असून, खुलासा सादर करावा, अन्यथा त्यांचे काहीही म्हणणे नाही, असे गृहीत धरून आयोग एकतर्फी निर्णय घेईल, तसेच कारवाई करावी की नाही, हा राज्य महिला आयोगाचा अधिकार असल्याचेही चाकणकर यांनी यावेळी सांगितले.

या पत्रकार परिषदेत बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या की, गुरुवारी चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत खोटी माहिती दिली. महिला आयोगाने तेजस्विनी पंडित हिला कधीही नोटीस पाठविली नाही. दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठविली होती. चित्रा वाघ यांनी आकसापोटी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी महिला आयोगाविरोधात भूमिका घेत आहेत. दोन समाजांत तेढ निर्माण करण्याच प्रयत्न आणि आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी चित्रा वाघ यांना नोटीस पाठविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तुम्ही अपयशी ठरलात...

चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह उभा केल्यावर त्याला प्रत्युत्तर देताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या की, महाराष्ट्र तुम्हाला भाकरीच्या तुकड्याचा प्रश्न विचारतोय अन् तुम्ही कपड्यांच्या तुकड्यावर बोलताय, लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण अपयशी ठरला आहात. महागाई, रोजगार यावर लोकांच्या प्रश्नाला तुम्हाला उत्तरे देता आली पाहिजेत.

Web Title: Notice to Chitra Wagh for contempt of State Commission for Women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.