येरवडा कारागृह अधिकाऱ्यांना नोटीस
By admin | Published: November 4, 2014 03:52 AM2014-11-04T03:52:37+5:302014-11-04T03:52:37+5:30
माफीचा साक्षीदार राजेश चौधरीने तुरुंगाच्या आत तुरुंग अधिकाऱ्यांकडून मारहाण होते व याबाबत कोणाालाही सांगितल्यास एड्सचे इंजेक्शन देण्याची धमकी दिल्यासंदर्भात मागील आठवड्यात अर्ज सादर केला होता.
पुणे : संगणक अभियंता नयना पुजारी खून खटल्यातील माफीच्या साक्षीदाराने न्यायालयात सादर केलेल्या अर्जप्रकरणी विशेष न्यायाधीश साधना शिंदे यांनी कारागृह अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस काढली आहे. माफीचा साक्षीदार राजेश चौधरीने तुरुंगाच्या आत तुरुंग अधिकाऱ्यांकडून मारहाण होते व याबाबत कोणाालाही सांगितल्यास एड्सचे इंजेक्शन देण्याची धमकी दिल्यासंदर्भात मागील आठवड्यात अर्ज सादर केला होता.
यासंदर्भात चौधरीने सोमवारी पुन्हा अर्ज केला होता. न्यायालयाने तुरुंग अधीक्षकांना ५ नोव्हेंबरच्या आत उपस्थित राहून संबंधित तुरुंग अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई का करण्यात आली नाही, याबाबत आपले म्हणणे सादर करण्याचा आदेश दिला आहे. यापूर्वी चौधरीने ३० आॅक्टोबर रोजी तुरुंग अधिकाऱ्यांच्या मारहाणीची व धमकी दिल्याबाबत न्यायालयात तक्रार अर्ज केले होते. त्यावर न्यायालयाने ससून रुग्णालय व तुरुंग अधिकाऱ्यांना मारहाणीचा तपशील अहवाल व आरोपीच्या तपासणीचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता.
चौधरीने सोमवारी केलेल्या दुसऱ्या अर्जानुसार, चौधरीने पहिला तक्रार अर्ज मागे घ्यावा यासाठी तुरुंग अधिकाऱ्यांनी पुन्हा दबाव आणला असून, तसे न केल्यास तुरुंगातून जिवंत बाहेर निघणार नसल्याची त्याला धमकी देण्यात आली. तसेच या प्रकाराने चौधरी हा भीतीच्या छायेत असून, दुसऱ्या तुरुंगात हलवण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)