फटाके व्यावसायिकांवर महापालिकेचा बडगा, १२५ जणांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 01:06 AM2017-10-24T01:06:21+5:302017-10-24T01:06:24+5:30
पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या निवासी भागात फटाकेविक्री नको, या आदेशाने आधीच हैराण झालेल्या फटाके व्यावसायिकांवर महापालिकेने आता दिवाळीनंतर बडगा उगारला आहे.
पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या निवासी भागात फटाकेविक्री नको, या आदेशाने आधीच हैराण झालेल्या फटाके व्यावसायिकांवर महापालिकेने आता दिवाळीनंतर बडगा उगारला आहे. परवानगी न घेता स्टॉल टाकला म्हणून तसेच परवानगी घेतल्यानंतर त्यातील अटी, नियम पाळले नाहीत म्हणून तब्बल १२५ व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला अनुसरून महापालिकेने अनेक फटाके व्यावसायिकांना परवानगी नाकारली होती. तरीही काही जणांना निवासी भागात दुकाने थाटल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले. त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
तसेच, परवानगी घेऊनही सुरक्षेच्या काहीही उपाययोजना
केल्या नाहीत असेही पाहणीत आढळले. त्यांनाही त्याबद्दल नोटीस पाठविण्यात आली आहे. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याबरोबर चर्चा करून याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असे जगताप यांनी सांगितले.