पिंपळे जगतापच्या शेतकऱ्यांना गॅस पाइपलाइनसाठी नोटिसा
By Admin | Published: August 20, 2016 05:13 AM2016-08-20T05:13:17+5:302016-08-20T05:13:17+5:30
पिंपळे जगताप, वाजेवाडी (ता. शिरूर) येथील शेतकऱ्यांना भारत सरकारच्या पेट्रोलियम पदार्थाची वाहतूक करण्यासाठी उरण ते चाकण-शिक्रापूरमार्गे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन
केंदूर : पिंपळे जगताप, वाजेवाडी (ता. शिरूर) येथील शेतकऱ्यांना भारत सरकारच्या पेट्रोलियम पदार्थाची वाहतूक करण्यासाठी उरण ते चाकण-शिक्रापूरमार्गे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे जमिनीतून पाइपलाइन घालणे आवश्यक आहे. त्यासाठी पेट्रोलियम व मिनरल पाइपलाइन अशा दोन लाइनसाठी जमीनवापराचा हक्क संपादन करण्यासाठी शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत.
चाकण-शिक्रापूर रोडच्या उजव्या बाजूने काही वर्षांपूर्वी रिलायन्स गॅस पाइपलाइनही टाकण्यात आलेली आहे. या नोटिशीमध्ये पाइपलाइन जमिनीखालून चार फूट, रेल्वे वगैरे आहे , त्या ठिकाणी आठ फूट व नदीच्या ठिकाणी १६ फूट खोलीतून जाणार आहे. पाइपलाइनचा आकार १२ इंच तर ज्या ठिकाणी उपलाइन होणार आहे. तेथे आकार १० इंच असणार आहे. पाइपलाइन गेल्यानंतर शेतकऱ्यांना शेती करण्यात येणार असून, लाइनवर घर, विहीर, तळे करता येणार नाही. यासाठी शेतजमिनीचे संपादन करण्यात येणार नसून, पाइपलाइन टाकल्यानंतर मालकही बदलणार नसल्याचा नोटिशीत उल्लेख करण्यात आलेला आहे. तसेच सदर जमीन वापराच्या हक्काबाबत मोबदला म्हणून जमीनमालकास जमिनीच्या सरकारी किमतीच्या १० टक्के रक्कम मोबदला म्हणून देण्यात येणार आहे.
जवळूनच गेलेल्या गॅसलाइनच्या वेळी तेथील शेतकऱ्यांची फसवणूक झालेली होती. तशी पुन्हा
आमची होऊ नये; अन्यथा यास
आम्ही विरोध करू, असे बाधित शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)