मतदार स्लिपबरोबर घरात पडल्या नोटा

By admin | Published: February 21, 2017 02:56 AM2017-02-21T02:56:29+5:302017-02-21T02:56:29+5:30

एरवी गजबजणाऱ्या बाजारपेठेत शुकशुकाट, झोपडपट्टीतील कट्ट्याकट्ट्यावर मात्र लोकांचे घोळके

Notices in the house with voters slip | मतदार स्लिपबरोबर घरात पडल्या नोटा

मतदार स्लिपबरोबर घरात पडल्या नोटा

Next

पिंपरी : एरवी गजबजणाऱ्या बाजारपेठेत शुकशुकाट, झोपडपट्टीतील कट्ट्याकट्ट्यावर मात्र लोकांचे घोळके... परिसरात घिरट्या मारणाऱ्या काळ्या काचेच्या मोटारी असे चित्र पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक निमित्ताने शहरात पहावयास मिळाले. कोठे मतदार याद्या बरोबर घेऊन मतदारांना पैसे वाटप करणारे पोलिसांच्या हाती लागत होते. वाकड परिसरात तर मतदार स्लिपसह प्रतिमतदार पाच हजार याप्रमाणे घराघरांत चक्क नोटा पोहोचविण्यात आल्याची चर्चा आहे. उमेदवारापैकी कोणालाही न भेटता दरवाजाखालून नोटा प्रत्यक्ष घरात पडल्याने नागरिकांना आश्चर्य वाटले. प्रतिमताचा भाव फुटला असून, पिंपळे सौदागरमध्ये पाच हजार, रहाटणीत ४, चिंचवडमध्ये ५, काळेवाडीत ४, पिंपरीत ५ हजार रुपये आणि भोसरीत सर्वाधिक १० हजार रूपये भाव होता.
मतदारांना विविध वस्तू वाटप केल्याच्या, पैसे वाटप केल्याच्या घटनाही घडू लागल्या आहेत. काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले, तर काही ठिकाणी तडजोडीने प्रकरणे मिटली. उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये राहणारा मतदार या निवडणूक प्रक्रियेत थेट सहभागी होत नाही. अशा मतदारांची मतदारयादीतील नावे घेऊन थेट त्यांच्या घरात मतदार स्लिपबरोबर जेवढ्या व्यक्ती त्यानुसार नोटा टाकल्या जात आहेत.(प्रतिनिधी)
बंदोबस्त गरजेचा
 सलग दोन, तीन आणि चार टर्म नगरसेवक राहिलेले नगरसेवकही याला अपवाद राहिले नाहीत. प्रभाग क्रमांक १०, १९ मध्ये अशाच उमेदवारांनी पैशांचे वाटप केले. दहशतवाद, भ्रष्टाचारमुक्त शहर अशी निवडणुकीत भाषणबाजी करणारे उमेदवारच नोटा वाटपात आघाडीवर असल्याचे दिसून आले.
 मतदानाच्या आदल्या दिवशी, तर रात्री घरोघरी जाऊन मतदारांना पैसे वाटप करण्यात आले. मतदान मंगळवारी सकाळी साडेसातपासून सुरू होणार असल्याने सोमवारी रात्री उशिरापर्यंत पैसे वाटपाचे नियोजन कार्यकर्त्यांनी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे बंदोबस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

Web Title: Notices in the house with voters slip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.