प्रदूषण राेखण्यासाठी उपाययाेजना न करणाऱ्या १२४ बिल्डरांना बजावल्या नोटीस
By राजू हिंगे | Published: November 26, 2023 03:34 PM2023-11-26T15:34:57+5:302023-11-26T15:35:14+5:30
शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत
पुणे: शहरातील हवा प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त केले असून, यातील बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विविध बांधकामाच्या साइटवर पाहणी करण्याचा धडाका लावला आहे. या पाहणीत प्रदूषण राेखण्याच्या दृष्टीने उपाययाेजना करण्यात कुचराई केलेल्या १२४ बांधकाम व्यावसायिकांना काम का थांबवू नये अशी नोटीस बजावण्यात आली आहे.
शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. यानुसार बांधकाम साइटवरून उत्सर्जित होणाऱ्या धुळीचे प्रमाण कमी करण्याच्या उपाययाेजनांचा समावेश आहे. त्यानुसार पुणे महापालिकेने बांधकाम विभागाच्या सेवकांद्वारे विविध बांधकामांच्या साइटवर पाहणी करण्याचे काम सुरू केले.यात प्रामुख्याने मध्यवर्ती पेठा, कोरेगाव पार्क,बाणेर बालेवाडी या भागाचा समावेश आहे. प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता खालविल्याने नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने नियमावली जाहीर करत धुळ निर्माण होऊ नये, हवेत उडू नये यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने कारवाई सुरु केली आहे. यामध्ये २५ फुटापर्यंत पत्रे, हिरव्या ज्यूटचे कापड लावून धूळ उडण्याचे प्रमाण कमी करणे, पाणी मारणे अशी कामे करणे आवश्यक आहे. तसेच बाणेर येथे रुद्र राऊत या नऊ वर्षाच्या मुलाच्या डोक्यात लोखंडी गट्टू पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याने सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. त्यादृष्टीनेही महापालिकेच्या पथकाकडून प्रदूषण रोखण्यासह सुरक्षेसंदर्भात प्रत्यक्ष पाहणी केली जात आहे. त्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकाम प्रकल्पास काम का थांबवू नये अशी नोटीस बजावली आहे.
आता पर्यत बांधकाम विभागाच्या झोन क्रमांक १ मध्ये १५, झोन क्रमांक २ मध्ये २१, झाेन क्रमांक ३ मध्ये १८, झाेन क्रमांक ४ मध्ये १७, झाेन क्रमांक ५ मध्ये १२, झाेन क्रमांक ६ मध्ये १६, झाेन क्रमांक ७ मध्ये २५ जणांना या प्रकारे १२४ बांधकाम प्रकल्पांना नोटीस बजावण्यात आली आहे, असे अधिक्षक अभियंता युवराज देशमुख यांनी सांगितले.