कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीच्या पालनासाठी पुणे पोलिसांकडून सोसायटींना नोटिसा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 04:37 PM2020-04-03T16:37:58+5:302020-04-03T16:39:19+5:30
पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कलम १८८ नुसार कारवाई
पुणे: शहरात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी यासाठी पोलिसांनी आता वेगवेगळ्या सोसायटीना नोटीसा बजावण्यास सुरुवात केली आहे. हडपसर भागातील सोसायटींच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. सोसायटीतील नागरिकांना संचारबंदीच्या आदेशाचे पालन करावे, असे त्या नोटिसच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
सोसायटीतील एखादी व्यक्ती बाहेरील देशातून किंवा परराज्यातून आली असल्यास तो त्याचे अस्तित्व लपवून राहत आल्याचे आढळून आल्यानंतर त्वरीत याबाबतची माहिती पोलिसांना द्यावी. कोरोनाबाबतची दिशाभूल करणारी माहिती समाजमाध्यमावर प्रसारित करु नये. पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कलम १८८ नुसार कारवाई केली जाई. नागरिकांनी सकाळी आणि सायंकाळी बाहेर फिरायला जाणे टाळावे तसेच पाळीव प्राण्यांना शक्यतो बाहेर नेऊ नये. सोसायटीतील एखादा रहिवाशी आजारी पडल्यास किंवा तो कोरोना बाधित असल्यासारखी लक्षणे वाटल्यास त्वरीत १०८ रूग्णावाहिका सेवेबरोबर संपर्क साधावा. सोसायटीतील एखाद्याा रहिवाशाचे विलगीकरण करण्यात आले असल्यास तसेच तो बाहेर पडताना आढळून आल्यास त्वरीत याबाबतची माहिती पोलिसांना कळवावी. असे हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साठे यांनी सांगितले.
सोसायटीच्या आवारात येणारे भाजीपाला विक्रेते, दूध तसेच किराणा माल वितरकांबरोबर समन्वय साधावा. एकाचवेळी सर्वांना सोसायटीत बोलावू नये. त्यांच्या वेळा ठरवून घ्याव्यात तसेच खरेदी करताना पुरेसे अंतर (सोशल डिस्टन्सिंग) पाळावे. सोसायटीत येणाऱ्या नागरिकांना सॅनिटायझरचा वापर करण्यास सांगण्यात यावे. सोसायटीतून बाहेर पडणारे तसेच येणाऱ्या नागरिकांची नोंद करण्यात यावी. अनावश्यक कामासाठी रहिवाशांनी बाहेर पडू नये, असे आवाहन साठे यांनी केले आहे.