पेपर ‘सेट’ करणाऱ्या प्राध्यापकांना विद्यापीठाकडून नोटिसा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 01:44 AM2019-02-19T01:44:21+5:302019-02-19T01:44:38+5:30
चौकशी सुरू : सोशल मीडियावर छायाचित्रे टाकून वाजवला होता डंका
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या काही प्राध्यापकांनी आम्ही पेपर सेट करायला गेलो होतो, अशी शेखी मिरविणारा ग्रुप फोटो सोशल मीडियावर टाकून गोपनीयतेचा भंग केल्याचे ‘लोकमत’ने उजेडात आणले होते. विद्यापीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे. संबंधित प्राध्यापकांना नोटिसा बजाविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
पेपर सेट करायला गेले असल्याच्या प्रकरणाबाबत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, अधिष्ठाता डॉ. विजय खरे यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित प्राध्यापकांना नोटिसा बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. एकाच महाविद्यालयातील चार प्राध्यापक अर्थशास्त्र विषयाचे प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी बोलाविण्यात आल्याच्या प्रकाराचीही गंभीर नोंद या बैठकीत घेण्यात आली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बीए, बीकॉम, बीएस्सीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्या-त्या विषयांच्या अभ्यास मंडळांकडून प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी तज्ज्ञ प्राध्यापकांची निवड केली जाते. या प्राध्यापकांनी प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम अत्यंत गोपनीय पद्धतीने करणे आवश्यक असते. प्रश्नपत्रिका तयार करणे हे काम अत्यंत संवेदनशील मानले जाते. विद्यार्थ्यांना तसेच इतर कुणाकडेही याबाबत त्यांनी वाच्यता करायची नसते. मात्र, ही गोपनीयता धुडकावून लावत प्रश्नपत्रिका तयार करणाºया अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांनी सोशल मीडियावर पेपर सेट करायला गेलो असल्याचे फोटो टाकले होते.
याबाबतचे वृत्त रविवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर यावर विद्यापीठ वर्तुळातून टीकेचा भडिमार करण्यात आला होता. अनेक ज्येष्ठ प्राध्यापकांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
चौकशी करून अहवाल देऊ...
कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी दिलेल्या निर्देशानुसार पेपर सेट करण्यासाठी गेल्याचे सोशल मीडियावरून शेअर केल्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. संबंधित प्राध्यापकांना नोटिसा बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. त्यानंतर याबाबतचा अहवाल विद्यापीठाकडे सादर केला जाईल.
- डॉ. विजय खरे, अधिष्ठाता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ