जिल्हा प्रशासनाच्या नोटिशीस केराची टोपली
By admin | Published: May 16, 2017 06:46 AM2017-05-16T06:46:37+5:302017-05-16T06:46:37+5:30
पुणे महापालिकेला दिलेली जमीन पालिकेने परस्पर ‘सी डॅक’ला भाडेतत्त्वावर दिली असून त्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने महापालिकेला नोटीस बजावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महापालिकेला दिलेली जमीन पालिकेने परस्पर ‘सी डॅक’ला भाडेतत्त्वावर दिली असून त्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने महापालिकेला नोटीस बजावली आहे. मात्र, या नोटिशीची मुदत संपल्यानंतरही पालिकेने कोणतेही उत्तर दिलेले नाही. नोटिशीला केराची टोपली मिळाल्याने जिल्हा प्रशासनाने महापालिकेवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
राज्य शासनाच्या अखत्यारीतील येरवड्यातील सरकारी जमीन १९९२मध्ये महापालिकेला देण्यात आली होती. पालिकेने कोणतीही परवानगी न घेता ही जागा सेंटर फॉर डेव्हलपमेंट आॅफ अॅडव्हान्स कॉम्प्युटिंग (सी-डॅक) या संस्थेला भाडेतत्त्वाने दिली. ही बाब लक्षात आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने महापालिकेला नोटीस बजावून ८ दिवसांत उत्तर द्यावे, अशी सूचना केली होती. परंतु, ८ दिवसांची मुदत उलटून गेल्यानंतरही पालिकेकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.
सरकारी जमीन दिल्यानंतर तिचा वापर भाडेतत्त्वावर करता येत नाही. पालिकेने या संदर्भात कोणतीही परवानगी न घेता सी-डॅकला जागा भाडेतत्त्वाने दिली. त्यामुळे करारभंग झाला असून, पालिकेला नोटीस बजावण्यात आली. पालिकेकडून कोणताही खुलासा करण्यात आला नसल्याचे महसूल विभागाचे तहसीलदार प्रल्हाद हिरामणी यांनी सांगितले.